ममतांची शेवटाकडे सुरुवात; ३ आमदार व ५० नगरसेवकांचा भाजप प्रवेश

    दिनांक  28-May-2019 


कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारला भाजपने मोठा धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. याचवेळी बंगालमधील तब्बल ५० नगरसेवकांनीदेखील भाजप प्रवेश केला. नवी दिल्लीमध्ये आयोजीत एका कार्यक्रमामध्ये या सर्वांनी पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांच्यासोबत बैरकपुरचे आमदार आमदार शिलभद्र दत्ता व नोआपारा विधानसभेचे आमदार सुनील सिंह असे भाजप प्रवेश करणाऱ्या आमदारांची नावे आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील विविध विभागातील ५० नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला. यातील सर्वाधिक नगरसेवक हे कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती महानगरपालिकेमधील आहेत.

 

ये तो सिर्फ झांकी है

 

तृणमूल काँग्रेसला धक्का दिल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी ये तो सिर्फ झांकी है' असल्याचे सांगत, पश्चिम बंगालमध्ये आणखीन मोठे धक्के बसणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना विजयवर्गीय म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये जशा सात टप्प्यामध्ये निवडणुका पार पडल्या, तशाच सात टप्प्यात भाजपमध्ये प्रवेश होणार आहेत. सात टप्प्यापैकी आजचा हा पहिला टप्पा होता.

 

भाटपारा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा

 

भाटपारा नगरपालिकेवर भाजपने झेंडा रोवला आहे. याआधी तृणमूल काँग्रेसची येथे सत्ता होती, त्यांच्या नागराध्यक्षावर अविश्वास ठराव मंजूर करून भाजपने आपले बहुमत सिद्ध केले आहे. ३४ नगरसेवक असलेल्या या नागरपालिकेमध्ये भाजपचे ११ नगरसेवक निवडणून आले होते. तर तृणमूल काँग्रेसच्या ८ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे पक्षीय बल वाढत १९ नगरसेवक झाले. त्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या नागराध्यक्षवर अविश्वास ठराव आणत सत्ता स्थापन केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat