बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच बाजी

    दिनांक  28-May-2019 


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावी बोर्डाचा ८५.८८ टक्के इतका निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा ७.८५ टक्के अधिक आहे.

 

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ मुलांची संख्या होती तर मुलींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती. दरम्यान, ४४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

 

ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून, यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बारावीची पुरवणी परीक्षा मागील वर्षाप्रमाणेच जुलै- ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

 

निकाल कसा पाहणार?

 

www.mahresult.nic.in I www.hscresult.mkcl.org I results.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण सदर संकेतस्थळावर दिसतील तसेच याची प्रिंटआऊटही घेता येईल. याशिवाय बारावीचा निकाल एसएमएस सेवेद्वारेही मोबाईल फोनवरुन मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध होतील. MHHSC<space> <seat no> असा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठविल्यास विद्यार्थ्यांना निकाल कळू शकेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat