पिल्लांना हक्काचे घर...

    दिनांक  28-May-2019


 


दि.२६ मे २०१९ स्थळ : सीवूड सेक्टर ४४. एस. एस. हायस्कूल येथे देशी कुत्र्यांच्या ३४ पिल्लांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम पार पडला. रस्त्यावर बेवारस फिरणार्‍या आणि अत्यंत धोकादायकरीत्या जगत असलेल्या या पिल्लांना हक्काचे घर आणि माया मिळाली.

 

नवी मुंबई विमानतळ बांधकामासाठी, निर्धारित जागेवरील गावांचे स्थलांतरण करण्यात आले आहे आणि मनुष्यवस्ती तेथून हटविण्यात आली. परंतु, त्या जागेवर वास्तव्य करणारे कुत्रे, मांजरी मात्र त्या भागात अजूनही राहत आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार या जनावरांच्या पुनर्वसनासाठी अजून काही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. त्यांचे होणारे हाल हे नवी मुंबई पनवेल भागातील प्राणीमित्र तरुणांना पाहावले नाही आणि आदिती परमेश्वरम, पूजा तेली, वर्षा पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली या भागातील मुक्या जीवांना रोज मूलभूत आहार पुरविण्याचे निरंतर कार्य गेल्या तीन महिन्यांपासून चालू आहे. या स्थळी बांधकामाची साधनसामुग्री वाहून नेणार्‍या मोठ्या वाहनांच्या वाहतुकीची वर्दळ चालू असते आणि त्यामुळे अपघातात बरीच पिल्ले दगावतात, हे लक्षात आल्यावर नवी मुंबईमधील प्राणीमित्र आणि संबंधित संस्था एकत्र येऊन त्यांनी या पिल्लांचे रक्षण करण्याचे आणि त्यांना नवीन कुटुंब देण्याचे ठरवले.

 

भूमी जीवदया’, ‘एनएमआयए.’, ‘सेव द पॉज’ आणि ‘आन्यूबिस टायगर’ या संस्थांनी एकत्र येऊन विमानतळ प्रकल्प भागातून पकडण्यात आलेल्या देशी बाळांना दत्तक देऊ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. सीवूडमधील एस. एस. हायस्कूल येथे हा कार्यक्रम गेल्या रविवारी पार पडला. या शाळेचे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी या कार्यक्रमासाठी सभागृह, तसेच सर्व स्वयंसेवकांच्या न्याहारीची निःस्वार्थ व्यवस्था केली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला नवी मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या दत्तक शिबिरामध्ये कुत्र्यांच्या ३४ बाळांचा दत्तक देण्यासाठी समावेश करण्यात आला होता आणि त्यांचे लसीकरण तसेच आरोग्याची विशेष काळजी ‘भूमी जीवदया’ संस्थेने घेतली होती. दत्तक घेण्याची प्रक्रिया रीतसर कायद्याने व्हावी, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती, तसेच दत्तक घेतलेल्या कुटुंबाला मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी डॉक्टर आणि सल्लामसलत करण्यास विशेष अधिकारीदेखील या कॅम्पमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

 

एकूण ३४ बाळांपैकी २९ बाळांना यशस्वीरित्या दत्तक घेण्यात आले आणि आजपर्यंत रस्त्यावर उदरनिर्वाह करणार्‍या या बाळांना सुरक्षित कुटुंबाची सुखदायक सावली लाभली. घाबर्‍याघुबर्‍या या जीवांना एकाच वेळी इतकं सारं प्रेम, लळा जेव्हा उपक्रमात सामील झालेल्या स्वयंसेवकांकडून मिळाला तेव्हा या बाळांच्या चेहर्‍यावर खुललेला आनंद काही वेगळाच होता आणि हाच आनंद आमच्यासाठी या मुक्या जीवांची एक निखळहॅप्पीवाली फीलिंग’ होऊन गेला. या उपक्रमात सहभागी होऊन असंख्य प्राणीमित्रांनी आणि त्याचबरोबर प्राणीमित्र संस्थांनी पुन्हा एकदा माणुसकीवरचा अटळ विश्वास अजून घट्ट केला.

 

आपल्या सगळ्यांच्या घरी बनलेले रोजचे जेवण रोज संपूर्णतः संपतेच असे नाही, घरातून बाहेर पडायचा कंटाळा करून आपण असे अन्न टाकून देतो आणि असे हे अन्न कचराकुंडीतून हुडकून काढून रस्त्यावरील कुत्रे-मांजरी खातात, पण ते खाताना कचरापेटीत काचा, प्लास्टिक किंवा अजून बरेच काही हानिकारक पदार्थ या अन्नासोबत खाल्ले जातात आणि यामुळे आजारी पडून कित्येक प्राणी रोज दगावत आहेत. तेच अन्न जर वेळीच आपण एखाद्या गरजूला किंवा बिल्डिंग किंवा चाळीलगतच्या प्राण्यांना दिले तर ते वाया जाणार नाही आणि त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. आजच्या उपक्रमाबद्दल सांगायचे तर मनापासून खूप सारे आभार, त्या प्रत्येक कुटुंबाचे ज्यांनी या देशी बाळांना दत्तक घेऊन त्यांना आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा बनवले.

- पूजा तेली

 

एन. एम. आय. ए. अध्यक्षमला फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती कळली. खूप मस्त उपक्रम होता आणि योग्यरित्या त्याचे नियोजनदेखील पाहायला मिळाले. वर्षा पिल्लई यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनमुळे डोक्यात असलेल्या सगळ्या प्रश्नांची वेळीच उत्तर मिळाली. मी आज एक पिल्लू दत्तक घेतले आहे आणि खूप छान वाटते आहे कुटुंबाच्या या नवीन सदस्यासोबत.

- भरत

 

कुत्र्याचे पिल्लू दत्तक घेतलेला सदस्यविकास... प्रगती ही झालीच पाहिजे. पण, ती होत असताना निसर्गाची हानी होणे योग्य नाही. निसर्गाचा समतोल बिघडला तर माणसाला खूप गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, आज बेसुमार वृक्षतोड होते, पक्षी-प्राणी यांना बेघर केले जातेय. तो त्यांचा आजचा त्रास आहे. पण, उद्या माणसांचा नंबरही लागेल, याचा विचार मनात येऊ द्यात आणि निसर्गाची होणारी हानी वेळीच थांबवा. प्रत्येकाने वैयक्तिक जमेल तितके या प्राणी आणि पक्ष्यांना मदत करा. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी न मिळाल्याने कित्येक पक्षी मरतात, तुम्ही राहता तिथे पाण्याची लहान भांडी ठेऊ शकता. कुत्र्यांना एखादा बिस्किटचा पुडा तर तुम्ही देऊच शकता. या सगळ्या गोष्टींवर नक्की विचार करा.

- हरिश अय्यर, समान हक्क कार्यकर्ते, मुंबई

 
- विजय माने 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat