‘रॅगिंगचा‘ आवळता फास

    दिनांक  28-May-2019पूर्वी महाविद्यालयात नवीन विद्यार्थी आणि जुन्या विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारे मैत्रीपूर्ण संबंध बनविण्यासाठी, ओळखीसाठी काहीशा हलक्याफुलक्या, फिरकी घेणार्‍या ‘रॅगिंग’चा वापर केला जात असे. मात्र, हळूहळू ‘रॅगिंग’चा अर्थ बदलून त्याला हिंसा, हिडीस आणि किळसवाणे स्वरूप प्राप्त होत गेले. ‘रॅगिंग’मध्ये ’फ्रेशर्स’ ना अतिशय लाजिरवाण्या, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का देणार्‍या कित्येक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. परंतु, यातील काही घटना इतक्या भयानक असतात की, ज्यात विद्यार्थ्यांनाही जीवाला मुकावे लागते. पण, ‘रॅगिंग’च्या अनेक प्रकरणांना किरकोळ प्रकरण म्हणून दुर्लक्ष केले जाते आणि मग त्याची परिणती डॉ. पायल तडवीच्या प्रकरणाप्रमाणे थेट आत्महत्येत होते. ‘रॅगिंग’ हा खरंतर गंभीर गुन्हा. कायद्यान्वये ‘रॅगिंग’ प्रकरणात दोषी आढळल्यास आरोपीला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. भारतात सर्व कॅम्पसमध्ये ‘रॅगिंग’वर बंदी आहे. अशी कृत्ये दंडनीय आहेत. रु. ५० हजार दंड, सहा महिने ते १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि विद्यार्थी ‘रॅगिंग’मध्ये गुंतलेले असण्याचे प्रमाणपत्रही दिले जाते, ज्याने त्यांच्या करिअरवर भविष्यात खूप मोठा परिणाम होऊ शकतो. सर्व विद्यापीठे आणि संस्थांना या अधिनियमाचा कोणताही विरोध झाल्यास विद्यापीठाच्या किंवा संस्थेच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, अशीही कायदेशीर तरतूद आहे. सन २००९-१० या शैक्षणिक सत्रादरम्यान देशभरात ‘रॅगिंग’मुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘रॅगिंग’ची टक्केवारी सर्वाधिक आहे. २०११ मध्ये महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे झालेल्या रॅगिंग प्रकरणात, अंतिम वर्षातील १३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. ते महाराष्ट्रातील पहिले प्रकरण होते. काही राज्यात ‘रॅगिंग’ची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत नागालँड, अंदमान आणि निकोबार, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आणि लक्षद्वीपमधील विद्यापीठांमधून अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. २०१३, २०१४ मध्ये १५ एमबीबीएस विद्यार्थ्यांचे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ‘रॅगिंग’ प्रकरणी निलंबन केले होते. महाराष्ट्रात २००९ ते २०१९ पर्यंत ‘रॅगिंग’च्या तक्रारी केलेल्या मुलामुलींची संख्या ही १६० मुले तर ३५ मुली अशी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता, या विरोधात आवाज उठवायलाच हवा.

 

‘रॅगिंग’ची ऐशीतैशी

 

जेव्हा आपण आयुष्याच्या कुठल्याही नवीन टप्प्यात पदार्पण करतो, तेव्हा अनेक आव्हाने नैसर्गिकपणे आपल्या प्रतीक्षेतच असतात. जेव्हा विद्यार्थी शालेय जीवनातून बाहेर पडतो आणि महाविद्यालयात प्रवेश करतो, तेव्हा ते संपूर्ण त्याच्यासाठी नवीन असते. ‘रॅगिंग’ हाही त्यातलाच एक अस्वीकार्य प्रकार. आज बहुतांशी महाविद्यालयांमध्ये ‘रॅगिंग’ची जागा ‘फ्रेशर्स पार्टी’ने घेतली असली तरी ‘रॅगिंग’ला पूर्णविराम मिळालेला नाही. देशभरात अनेक विद्यार्थ्यांनी ‘रॅगिंग’मुळे आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटना आपण वाचत-ऐकत असतो. पण, अशा घटनांना महाविद्यालयाबरोबरच विद्यार्थ्यांनीही अजिबात थारा देता कामा नये. ‘रॅगिंग’ विरोधात आपला आवाज उठविण्यास कदापि घाबरू नये. असा प्रयत्न झाल्यास, आत्मविश्वासाने त्यासाठी साफ नकार देऊन पुढे चालते व्हावे. तरीही त्या विद्यार्थ्यांनी ‘रॅगिंग’चे प्रयत्न चालू ठेवल्यास थेट तक्रार करण्याचा मार्ग स्वीकारावा. ‘रॅगिंग’ करणारे मुख्यतः अशक्त आणि एकट्या दिसणार्‍या विद्यार्थ्यांना त्रास देतात. म्हणून, जर आपण आपल्या मित्रांसह एकत्रित आवारात असाल तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता कमीच. एकदा आपल्या साथीदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर, ‘रॅगिंग’ करणार्‍यांना इशारा द्या की, आपण शांत राहणार नाही. कॉलेज प्राधिकरणाकडून मदत घ्या. प्रत्येक महाविद्यालयात ‘रॅगिंग’ विरोधात कडक नियम आहेत. त्यामुळे ‘रॅगिंग’ करणार्‍या विद्यार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई होई शकते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शिक्षकांना, पालकांना विश्वासात घ्यावे. त्यांना अशा प्रकारांची कल्पना द्यावी, जेणेकरून ते समर्थपणे ही परिस्थिती हाताळू शकतील. एकूणच, ‘रॅगिंग’असो वा आयुष्यातील इतर समस्या, आत्महत्या हा कधीही त्यावरचा अंतिम उपाय असू शकत नाही. तेव्हा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘रॅगिंग’ला बळी न पडता, इतरही कुणाबरोबर असले प्रकारे करता कामा नये. कारण, दोन मिनिटांच्या मजेचे रूपांतर सजेत व्हायला वेळ लागणार नाही. पालकांनीही आपल्या पाल्यांना अशा प्रकारांची पूर्वकल्पना देऊन त्यांना आधीच मार्गदर्शन केल्यास मुलांमध्येही विरोध करण्याचा, ‘नाही’ म्हणण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो व ते असल्या गैरप्रकारांना बळी पडणार नाहीत.

 
 - कविता भोसले
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat