'बीएनएचएस'ने मुंबईत केले चार हजार पक्ष्यांना 'रिंग'

    दिनांक  28-May-2019


 


वेदांत कसंबेने पाच तासांत केली 'रिंग' लावलेल्या ५७ पक्ष्यांची नोंद

 

मुंबई (अक्षय मांडवकर) :  'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या उद्देशाने गेल्या दहा महिन्यांमध्ये(बीएनएचएस) मुंबईतून चार हजार स्थलांतरित पक्ष्यांना रिंग आणि कलर टॅग केले आहे. याशिवाय 'बीएनएचएस'चे विद्यार्थी सदस्य असलेल्या वेदांत कसंबे यांनी रिंग आणि कलर टॅग केलेल्या ५७ पक्ष्यांना एकाच दिवशी टिपले आहे. त्याच्या या निरीक्षणामुळे पक्षी स्थलांतरणाच्या महत्वपूर्ण अभ्यासाला मदत होणार आहे. तसेच पक्षी स्थलांतराची माहिती संकलित करण्यासाठी 'बीएनएचएस'कडून लवकरच एक 'मोबाईल अॅप' प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

 

 
बीएनएचएस' ही संस्था १९५९ सालापासून भारतातील पक्ष्यांच्या लांब पल्ल्याच्या स्थलांतराचे संशोधन करीत आहे. या माध्यमातून आजवर त्यांनी ५ खंड आणि २९ देशांमधून तीन हजार पक्ष्यांच्या स्थलांतराच्या नोंदी मिळविल्या आहेत. पक्ष्यांना रिंग (अर्थात अल्युमिनियम चे कडे वा वाळा) कलर टॅग आणि नेक काॅलर लावण्याचे काम प्रामुख्याने संस्थेच्या तामिळनाडूमधील पाॅईंट कॅलिमर आणि ओडिसातील चिलिका तलाव येथील केंद्रांमध्ये होते. मात्र यंदा प्रथमच मुंबईत काही पक्ष्यांना रिंग आणि कलर टॅग लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम आॅगस्ट २०१८ ते मे २०१९ या कालवधीत पू्र्ण करण्यात आला. याअंतर्गत ३९०६ चिखलपायटे आणि ३९ रोहित (फेल्मिंगो) पक्ष्यांना कलर टॅग आणि रिंग करण्यात आले आहे. उरणमधील पांजे आणि नवी मुंबईतील टीएस चाणक्य या पाणथळांवर पक्ष्यांना कलर  टॅग आणि रिंग लावल्याची माहिती 'बीएनएचएस'चे सहाय्यक संचालक राहुल खोत यांनी दिली. 'मिस्ट नेटिंगअर्थात जाळे लावून आणि 'नूज ट्रॅप"   (विशिष्ट प्रकारचे फासे) ने पक्ष्यांना पकडून त्यांनी टॅग लावून ताबडतोब सोडल्याचे त्यांनी सांगितले. 
 

 
 

तसेच 'बीएनएचएस'चा विद्यार्थी सदस्य असलेल्या १८ वर्षीय वेदांत कसंबे याला एकाच दिवशी कलर टॅग आणि रिंग केलेल्या ५७ पक्ष्यांना टिपण्यात यश मिळाले आहे. केवळ पाच तासांमध्ये त्याने या पक्ष्यांना टिपले. ११ मे रोजी नवी मुंबईतील टी एस चाणक्य येथे पक्षी निरीक्षणासाठी गेल्यावर पक्ष्यांची एक हजार छायाचित्रे टिपल्याची माहिती वेदांत याने दिली. त्यामधील छोट्या चिखल्या (लेसर सॅंड प्लोवर), सामान्य टिलवा (कॉमन रेडशांक), बाकचोच तुतारी (कर्ल्यु सॅंडपायपर) अशा ५७ पक्ष्यांना कलर टॅग आणि रिंग केल्याचे आढळल्याने त्याची माहिती 'बीएनएचएस'ला दिल्याचे त्याने सांगितले. वेदांत हा ठाण्याच्या बी.एन.बांदोडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी असून 'बीएनएचएस'चे सहाय्यक संचालक (शिक्षण) डाॅ.राजू कसंबे यांचा मुलगा आहे. आपल्या वडीलांमुळेच पक्षी निरीक्षणाची आवड बालपणापासूनच जडल्याचे वेदांत सांगतो.

 

रिंगिंग म्हणजे काय?

या पद्धतीमध्ये पक्ष्याच्या पायात अंगठीसारखा वाळा घातला जातो (पायाला एक गोलाकार रिंग लावली जाते). त्यावर देशाचा किंवा संस्थेचा विशिष्ट सांकेतिक क्रमांक असल्याने स्थलांतरानंतर पक्ष्याच्या ठावठिकाण्याची अचूक माहिती मिळते. याशिवाय गेल्या दशकापासून पक्ष्यांना नेक कॉलर आणि कलर टॅगिंग करण्यात येत आहे. नेक कॉलरमध्ये पक्ष्याच्या मानेला सांकेतिक क्रमाकांची पट्टी लावली जाते. तर कलर टॅगिंगमध्ये परिक्षेत्रानुसार रंग ठरवून त्या परिक्षेत्रातील पक्ष्यांना त्या रंगाची पट्टी लावली जाते. उदाहरणार्थ, दक्षिण भारतातील पक्ष्यांना काळ्या व पांढर्‍या रंगाची आणि उत्तर भारतातील पक्ष्यांना पाढंऱ्या रंगाच्या दोन पट्टय़ा लावण्यात येतात. त्यामुळे पक्षी अभ्यासकांना हा पक्षी कोणत्या भागातून आला आहे, हे समजणे सोपे जाते.

 

यंदाच्या रंजक नोंदी

गेल्या वर्षभरात संस्थेने काही पक्ष्यांच्या रंजक स्थलांतराच्या पट्ट्यांची नोंद केली आहे. गुजरातमधील खिजाडिया येथे दोन मोठ्या रोहितांना (ग्रेटर फ्लेमिंगो) त्यांच्या स्थलांतराच्या कालावधीत कलर टॅग करण्यात आले होते. त्यातील एक रोहित राजस्थान मधील बिकानेर येथे तर दुसरा मुंबईतील पाणथळ क्षेत्रात आढळून आला. तसेच ओडिसातील चिलिका तलाव आणि तामिळनाडूमधील पाॅईंट कॅलिमर येथे टॅग केलेले काही पाणपक्षी त्यांच्या स्थलांतराच्या परतीच्या प्रवासात चीन आणि उत्तर कोरियाच्या किनाऱ्यांलगत असलेल्या पाणथळींवर आढळून आले.

 
 पाणथळ जागांच्या संरक्षणार्थ काही धोरणांची निर्मिती करताना पक्षी स्थलांतराच्या शास्त्रीय नोंदी महत्वाची भूमिका बजावतात. पक्षी स्थलांतराच्या शास्त्रीय अभ्यासामुळे 'सेंट्रल एशियन फ्लायवे' अर्थात पक्षी स्थलांतर मार्गाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई आणि उरणमधील पाणजे, एनआरआय, टीएस चाणक्य, बेलपाडा, भेंंडखळ आणि भांडुप उद्दचन केंद्र या पाणथळीच्या जागांना महत्व प्राप्त झाले आहे. - डाॅ.दिपक आपटे, संचालक, बीएनएचएस
 

 

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat