आता कोचिंग सेंटरचा ‘क्लास’

    दिनांक  27-May-2019


महापालिका, सरकारसह संघटनांनीही जारी केले अत्यावश्यक निर्देशमुंबई : सुरतमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये लागलेल्या आगीत 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोचिंग क्लासेसमधील अग्निसुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. मुंबई अग्निशमन दलातर्फे गेल्या वर्षभरात झालेल्या अग्निकांडानंतर आपली क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरत येथील घटनेत अग्निसुरक्षेसंदर्भात कोणतेही साहित्य उपलब्ध नव्हते, अशी माहिती उघडकीस येत आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मुंबईतील कोचिंग क्लासेसमध्ये कोणत्या सुरक्षा उपाययोजना उपलब्ध आहेत याची विचारणा पालकांकडून केली जात आहे.

 

मुंबईतील गल्लीबोळात उभ्या असलेल्या कोचिंग क्लासेसची महापालिकेकडील नोंदणी ही पालिकेच्या दुकानांसाठी देण्यात येणार्‍या परवान्यावर केली जाते. दरम्यान, काही बेकायदा चालवल्या जाणार्‍या कोचिंग क्लासेसमध्ये असा प्रकारच अस्तित्वात नसल्याने त्यांची नोंद ठेवणे पालिकेला कठीण होत आहे. राज्यातील कोचिंग क्लासेसचा होणारा विस्तार पाहता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात एक मसुदा तयार करण्यात आला होता. या अंतर्गत सुरक्षेसह अन्य बाबींवरही लक्ष केंद्रित केले गेले होते. कोचिंग क्लासेसच्या शुल्क आकारणीवर जीएसटी लागू केला जातो. मात्र, कोचिंग क्लासेसच्या मालकांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यावेळी पाच विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शिकवणी घेणार्‍या क्लासेसना कोचिंग सेंटरच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, कोचिंग क्लासेस विरोधामुळे हा प्रस्ताव बारगळला.

 

या कायद्याअंतर्गत प्रत्येक नव्या शाखेची नोंदणी, कोचिंग क्लासेसची नोंदणी आणि पुर्ननोंदणी, एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या, जाहिरातबाजीवर नियंत्रण, सरकारी प्रतिनिधींद्वारे कोचिंग सेंटरची तपासणी, कोचिंग क्लासेसचा पाच टक्के हिस्सा राज्य सरकारला देण्यात यावा, कायदा तोडणार्‍यांसाठी दोन वर्षांची कैद आदी मुद्दे या अंतर्गत लागू केले जाणार होते. महाराष्ट्र क्लासेस ओर्न्स असोसिएशनतर्फे आता सावध पवित्रा घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता अग्निसुरक्षेला महत्त्व देण्याची तयारी केली जाणार आहे. वर्गाच्या प्रवेशद्वारावर अग्निरोधक यंत्रणा बसवल्या जाव्यात, आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, सर्व कोचिंग क्लासेसमध्ये फायर ऑडिट केले जावे, तळमजल्यावर सुरू असलेल्या सर्व क्लासेसच्या शाखा बंद केल्या जाव्यात, असा पवित्रा महाराष्ट्र क्लासेस असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात लवकरच एक परिपत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे सचिन कर्नावट यांनी दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat