'स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव' पुस्तकाचे प्रकाशन

    दिनांक  27-May-2019


 

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र' आयोजित पुस्तक प्रकाशन व विशेष सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. 'स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव' या पुस्तकाचे प्रकाशन प्रदीप रावत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात रत्नागिरीमध्ये १९३१ साली सर्व जातींसाठी पतित पावन मंदिर उभारणारे भागोजिसेठ किर यांचे वंशज विवेक कीर, सावरकर घराण्यातील महिलांवर आधारित 'त्या तिघी' या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करणाऱ्या अपर्णा चोथे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

यावेळी पुस्तकाचे लेखक अक्षय जोग आणि प्रकाशक सात्यकी सावरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सावरकर अध्यासन केंद्राचे समन्वयक सागर शिंदे यांनी केले तर आभार अध्यासन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी मानले. प्रदीप रावत यांनी उपस्थितांना संबोधित केले. रावत म्हणाले, "लोकसभा निवडणुकीतील विजयातून सावरकरांच्या राजनीतीला आज न्याय मिळाला आहे. सावरकरांच्या संपूर्ण भूमिकेला जी एक चौकट आहे ती राष्ट्रहिताची आहे. हिताचे-अहिताचे, योग्य-अयोग्य याच्या निकषाची कसोटी काय, तर बुद्धिप्रामाण्यावर आधारित विज्ञाननीष्ठा ही कसोटी आहे. जम्मू-कश्मीर प्रश्नाच्या मुळाशी राजकीय कट्टरतावादी इस्लामिक विचारसारणी आहे हे समजून घ्यायाला लागेल. पुरोगामी विचारांच्या नावाखाली देशातील एकत्वाला तडे जातील असे राजकारण केले गेले. देशाच्या हितासाठी बुद्धिप्रामान्यावर आधारित विज्ञाननिष्ठ विचारात असल्याची देणगी सावरकरांनी दिली. आज लोकसभेतील विजयाने ते राजकीय पटलावर प्रत्यक्ष उतरले आहे."

 


सावरकरांना जसेच्या तसे स्विकारण्यात हिंदुत्ववादी कमी पडले असे सांगताना रावत म्हणाले, "सावरकरांचे संपूर्ण विज्ञाननिष्ठ हिंदुत्व लोकांनां पचायला जड गेले. त्यांनी त्यांच्या सोयीचे, सोपे वाटतील असे सावरकर स्वीकारले. त्यामुळे सावरकर तळागाळापर्यंत पोहचवण्यात समर्थक कमी पडले. सावरकर आणि आंबेडकर यांच्या ध्येयसृष्टीतील संविधाननिष्ठ समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. तेंव्हा दोघांचा विचार शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचायला हवा.", असेही ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat