सिंधुदुर्गमधून 'टाचणी'च्या नव्या प्रजातीचा उलगडा

    दिनांक  27-May-2019
'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' असे नामकरण

 

मुंबई (अक्षय मांडवकर) : मुंबईतील दोन तरुण संशोधकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून 'टाचणी'च्या नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. चतूरांचाच एक प्रकार मात्र 'टाचणी' या स्वतंत्र्य गटात मोडणाऱ्या या नव्या प्रजातीचे नामकरण 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' असे करण्यात आले आहे. किटकांमध्ये या प्रजातींचा समावेश होतो.
 

बालपणी चतूराच्या शेपटीला दोरा बांधून आपण सगळ्यांनीच त्याच्याबरोबर खेळण्याचा आनंद लुटला आहे. या चतूरांमधीलच एक प्रकार असणाऱ्या 'टाचणी'च्या प्रजातींमध्ये एका नव्या प्रजातीची भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील विमलेश्वर गावातून या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. स्वतंत्र्य संशोधक म्हणून काम करणारे मुंबईतील डाॅ. दत्तप्रसाद सावंत आणि शंतनु जोशी यांनी या 'टाचणी'चा उलगडा केला आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या 'जर्नल आॅफ थ्रेअटेन्ड टॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. ही नवी प्रजात 'सेरीग्रिआॅन' या पोटजातीमधील असून भारतात या पोटजातीच्या ५ प्रजाती आढळतात.

 
 

२०१७ मध्ये या नव्या प्रजातीला सर्वप्रथम विमलेश्वर गावात डाॅ. दत्तप्रसाद सावंत यांनी छायाचित्रित केले होते. त्यानंतर या प्रजातीमधील नर आणि मादीचा नमुना गोळा करुन शंतुन जोशी यांच्या मदतीने त्यांना बंगळूरू येथील 'नॅशनल सेन्टर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स'  या संस्थेत चाचणीसाठी पाठविल्याची माहिती सावंत यांनी दिली. 'आकारशास्त्रा'च्या (मार्फोलाॅजी) आधारे निरीक्षण केल्यानंतर 'टाचणी'ची ही प्रजात 'सेरीग्रिआॅन' पोटजातीमधील इतर प्रजातींपेक्षा स्पष्टपणे वेगळी दिसत होती. त्यामुळे गुणसुत्र (डीएनए) चाचणीची गरज भासली नसल्याचे त्यांनी सांगितले. या टाचणीचे नामकरण 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' असे करण्यात आले आहे. मु्ख्य म्हणजे ही प्रजात केवळ गोड्या पाण्यात आढळते. गोड्या पाण्याची जलस्त्रोत प्रदूषित झाल्यास या टाचण्या त्या ठिकाणी अधिवास करत नाहीत.

 

 

 

साचून राहिलेल्या गोड्या पाण्यात किंवा भाताच्या शेतीसाठी साचून ठेवलेल्या पाण्याचा आसपास ही प्रजात आढळते. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' टाचणी दिसून येते. यामधील नर हा हळदीसारखा पिवळसर रंगाचा साधारण ३.९ सेंटीमीटर आकाराचा असतो. तर मादी त्यापेक्षा किंचीत लहान ३.७ सेंटीमीटरची असून हिरवट पिवळ्या रंगाची असते. ही प्रजात अंडी, अळी, कोश आणि किटक अशा अवस्थेमधून विकसित होते. डासांच्या अळ्या, डास, छोटे किटक हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat