होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-२०

    दिनांक  27-May-2019होमियोपॅथिक तपासणीमध्ये एखाद्या रुग्णाची शारीरिक वा मानसिक स्थिती जाणून घेताना त्या रुग्णाचे बालपणापासूनचे वागणे किंवा स्वभाव व लहान असताना त्याला झालेले आजार, हे जाणून घेणे फार उपयुक्त असते. बर्‍याच वेळेला मोठेपणी माणसाचे वागणे हे तडजोडयुक्त असते

 
(Compensated behaviour) व त्यातून त्या माणसाचा मूळ स्वभाव जाणून घेण्यास अडथळा येऊ शकतो. मात्र, त्या माणसाच्या लहानपणीची सर्व माहिती व त्याच्या स्वभावाबद्दल माहिती घेतली असता, आपल्याला असे लक्षात येते की, लहानपणीचा स्वभाव व वागणे हे मुक्त असते व त्याचबरोबर भावनासुद्धा अस्खलित असतात. त्यात बरेचदा कुठलीही लपवाछपवी नसते. या प्रकारच्या वागण्यात कुठल्याही प्रकारे तडजोड केलेली नसते. (Uncompensated behaviour) आणि हेच खरे वागणे व स्वभाव असतो. बर्‍याचदा हाच लहानपणीचा स्वभाव काही तडजोडयुक्त बदलांसह आपल्याला मोठेपणी दिसून येतो. आणि म्हणूनच लहान वयातील गोष्टींची माहिती घेणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे रुग्णाची काही विशिष्ट प्रकारची वागणूकसुद्धा केस टेकिंग करताना महत्त्वाची असते. रुग्णाची एखादी लकब किंवा सवय, तसेच एखादे लक्षण वा चिन्ह डॉक्टरांना त्याचे औषध शोधण्यासाठी फार मदत करते.
 

उदाहरणार्थ- एखादा रुग्ण फार आजारी असतो व त्यासाठी त्याला हात धरून दवाखान्यात आणले जाते. जेव्हा त्याला विचारले जाते की, “काय त्रास होतोय?” अशावेळी हा रुग्ण सरळ सांगून मोकळा होतो की, “डॉक्टर, मला काहीही त्रास नाही. मी अत्यंत चांगला आहे. मला काहीही झालेले नाही.” या प्रकारचे वागणे हे अतिशय खास असते व होमियोपॅथिक औषधाच्या दृष्टीने महत्त्वाचे लक्षण असते. याच्या उलट काही रुग्ण दवाखान्यात आल्याआल्याच चक्क गयावया करतात व रडायलाच लागतात व सारखी विनंती करत राहतात की, “डॉक्टर, तुम्ही मला बरे करा, मी बरी होईन ना? मला काही मोठा आजार तर नाही ना झाला?” इत्यादी प्रश्न विचारत राहतात व घाबरतात.

 

तसेच काही रुग्ण, डॉक्टर एक दिवस जरी दवाखान्यात भेटले नाहीत तर कावरेबावरे होतात व सतत डॉक्टरांना विचारत राहतात की, “डॉक्टर तुम्ही कुठे बाहेर तर जाणार नाही ना? तुम्ही नसाल तर माझे कसे होणार?” या सर्व उदाहरणांमधून आपल्याला असे लक्षात येते की, रुग्णाच्या या व अशा विविध प्रतिक्रिया फार खास असतात व या प्रतिक्रिया त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रियेतून आलेल्या असतात व त्या त्वरित आल्यामुळे त्यामध्ये कुठलीही तडजोड किंवा लपवाछपवी नसते. या प्रकारच्या प्रतिक्रिया या मूळ स्वभावाच्या प्रतिक्रिया असतात व त्या चैतन्यशक्तीकडूनच आलेल्या असतात आणि म्हणूनच रुग्णाची बालपणाची माहिती व त्याच बरोबरीने अशी काही खास लक्षणे जर नीट तपासली तर, रुग्णाचे औषध कधीही चुकत नाही. पुढील भागात आपण रुग्णाच्या तपासणीबद्दल खोलात शिरून माहिती घेऊया...

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

9869062276

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat