अमेठीत भाजप कार्यकर्त्याची हत्या; स्मृती इराणींनी दिला पार्थिवाला खांदा

    दिनांक  26-May-2019


 


उत्तर प्रदेश : अमेठीत एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेंद्र सिंह असे या कार्यकर्त्याचे नाव असून ते अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी यांचे ते निकटवर्तीय होते. घटनेनंतर स्मृती इराणी यांनी ताबोडतोब सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेत हल्लेखोरांना पकडण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. यावेळी भावुक झालेल्या स्मृती इराणींनी सिंह यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ३ वाजता दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी सिंह यांच्यावर गोळीबार केला. यानंतर सुरेंद्र सिंह यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. सुरेंद्र सिंह हे अमेठीमधील बरौलिया गावातील माजी सरपंच होते. त्यांनी स्मृती इराणी यांच्या प्रचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिंह यांच्या कुटुंबांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर आरोप केल्यानंतर पोलिसांनी काही संशियिताना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat