कळा या लागल्या जीवा...

    दिनांक  26-May-2019   पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला टक्कर देत १८ जागा भाजपने जिंकल्या आहेत. याचाच अर्थ प. बंगालने तृणमूल काँग्रेसच्या बरोबरीने थोड्याफार फरकाने भाजपलाही पसंती दिली आहे. कधीकाळी कम्युनिस्ट पक्षाचा गड असलेला प. बंगाल ममता बॅनर्जींच्या तृणमूलने ‘चुपचाप फूलछाप’चा नारा देत हिसकावून घेतला होता. या नार्‍याला महत्त्व आहे. हिंसक कम्युनिस्टांच्या हो ला हो करत तृणमूलच्या निशाणीवर फुलावर छापा म्हणजे ‘तृणमूलला मते द्या,’ असा संदेश. पण, या निवडणुकीत तृणमूल कम्युनिस्टांच्या हिंसकतेवर कडी करताना दिसला. त्यामुळे की काय, प. बंगालच्या जनतेने पूर्वीचा तृणमूलचा नारा ‘चूपचाप फूल छाप’ऐवजी ‘चूपचाप कमल छाप’मध्ये बदलला. त्यामुळे कधी नव्हे ते प. बंगालमध्ये ‘कमळ’ उमलले. पण, यामुळे ममता बॅनर्जी इतक्या हताश झाल्या की, मॅडमनी थेट मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा विचार केला. अर्थात, तो राजीनामा त्यांच्या पक्षात फेटाळलाही गेला. तसे होणारच होते. ममतांच्या तृणमूलमध्ये ‘ममता मुख्यमंत्री नको’ असे म्हणणारे तृणमूलमध्ये पदाधिकारी म्हणून सोडा, कार्यकर्ते म्हणून तरी राहतील का? नाहीच राहणार, हे सगळ्यांना माहिती आहे. मोठ्या काँग्रेसच्या राजकुमारांनीही असाच राजीनाम्याचा घाट घातला, त्यांचाही राजीनामा पक्षाअंतर्गत असाच फेटाळला गेला. खरेतर राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी यांनी ‘मी राजीनामा द्यावा की नाही?’ या विषयावर इव्हीएम मशीनने किंवा अगदी बॅलटपेपरवर त्यांच्या त्यांच्या पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांचे मतदान घेतले तर? राजीनामे फेटाळणारे या ‘चुपचाप’ मतदानामध्ये राहुल किंवा ममता यांनी राजीनामा देऊ नये, यावर शिक्कामोर्तब करतील का? नाहीच. ते म्हणतील, “बस झालं, आता माफ करा, घरी बसा.” हे जे उत्तर असेल ते राहुल आणि ममता दोघांनाही माहिती आहे. त्यामुळे खुल्या बैठकीत आपल्या पदाधिकार्‍यांना मत विचारण्याचे ते नाटक करतात. हा नाटकाचा खेळ खेळून राहुल आणि ममता स्वतःचा जीव रमवत आहेत, इतकेच. काय करणार? कारण, भाजपने एकहाती सत्ता घेत राहुल आणि ममता यांना जी अवकळा आणली आहे, त्याचे वर्णन शब्दातीत आहे. दोघेही म्हणत असतील, ‘कळा या लागल्या जीवा...’

 

प्रकाश, प्रकाश टाकतील का?

 

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, भाजप आणि रा.स्व.संघ यांचे काहीतरी नक्की होईल, असे वाटावे इतके ते शब्दांचे अस्त्रशस्त्र वापरीत. अर्थात पेशवाई गाडू, मनूबिनू यांचीही फोडणी त्यामध्ये असे. अर्थात, प्रकाश यांच्यापाठी महामानवांचे आडनाव आहे. त्यामुळे ते वाचतात खरे. पण, या निवडणुकीमध्ये प्रकाशबापूंना त्या आडनावानेही तारले नाही. कसे तरतील? कारण, बाबासाहेब आंबेडकर आज जिवंत असते तर त्यांनी जातीपातीचे राजकारण करणार्‍यांना चांगलीच चपराक दिली असती. असो, पण निवडणुकीमध्ये दोन्ही जागांवर आपण का हरलो, लोकांनी आपल्याला का नाकारले, याचे विश्लेषण वगैरे बापूंनी केले की नाही माहिती नाही. नऊ जागांवर काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीमुळे हार पत्करावी लागली, असे काहीसे बापू म्हणत आहेत. त्याचवेळी बापूंनी “काँग्रेसची गुलामगिरी संपली, काँग्रेसला जिंकून द्यायचा मक्ता घेतलेला नाही,” असेही विधान केले आहे. निवडणुकीपूर्वी बापूंना काँग्रेसकडून १२ जागा हव्या होत्या. पण काँग्रेसने फेटाळल्या. बापूंच्या वंबआच्या टेकूने औरंगाबादमध्ये एमआयएमचे जलील जिंकून आले आहेत. मात्र, ते स्वतःला वंबआचे नाही, तर एमआयएमचे खासदार मानतात. असो, तर प्रकाश यांचे आता काय म्हणणे असेल? पुढच्या निवडणुकीत काँग्रेससोबत युती करून समान जागा मिळण्याचे स्वप्न ते सध्या पाहत आहेत. आता कोणी दुष्ट नतद्रष्ट असे म्हणाले की, म्हणजे या निवडणुकीमध्ये काँगे्रसला हरवण्यामध्ये प्रकाश आणि ओवेसींच्या वंबआचे अशंतः योगदान होते. मात्र, पुढच्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेस आणि वंबआ युती करेल, तेव्हा काँग्रेसच्या जबरदस्त अपयशामध्ये प्रकाशबापू तसेच ओवेसींच्या वंबआचे शतप्रतिशत योगदान असेल. असो, प्रकाशबापू आणि ओवेसीबंधू दोघेही समान विचारांचे म्हणून तर दोघांची युती झाली. त्यांच्या विचारांचे साम्यस्थळ काँग्रेसमध्ये आहे, असे या दोघांनाही वाटते. त्यांच्या या वाटण्यातच वंबआ, एमआयएम आणि काँग्रेस यांना जनतेने का नाकारले, याचे उत्तर आहे. पण, वंबआ आणि काँग्रेसही जनतेचा विचार करते असे जनतेला वाटले का? उत्तर निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट आहे. जनतेला तसे वाटत नाही. यावर वंबआचे प्रकाश काही प्रकाश टाकतील का?


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat