तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

25 May 2019 20:36:52



कोलकाता : लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारून १८ जागा काबिज केल्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. ज्या मतदारसंघांमध्ये तृणमूलचा दारुण पराभव झाला, तेथील स्थानिक नेते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुजोर प्रवृत्तीवर खापर फोडत आहेत, तर अनेक नेते पक्षातून बाहेर पडण्याचाही विचार करीत आहेत. यामुळे २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला एकत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान ममता बॅनर्जी यांच्यापुढे उभे ठाकले आहे.

 

भाजप बंगालमध्ये तृणमूलचे बालेकिल्ले अशाप्रकारे उद्ध्वस्त करेल, असा विचार या पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या मनात नव्हता. पण निवडणूक निकालांनी तृणमूलचे सर्वच नेते हादरले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत तृणमूलला मिळालेल्या मतांची टक्केवारी ३९ होती, आता ती ४३ टक्क्यांवर गेली आहे. दक्षिण बंगालमधील आदिवासीबहुल जंगलमहाल प्रांत, तसेच उत्तर बंगालमधील चहाच्या मळ्याचा पट्टा यासारखे गड कायम राखण्यात पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. या दोन्ही प्रांतांमधून तृणमूलचा पूर्णपणे सफाया झाला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते अद्याप या दारुण पराभवावर बोलण्यास तयार नाहीत. काहींना पक्षात मोठी फूट पडण्याची भीती वाटत असून, त्यांनी ती बोलूनही दाखवली आहे. तर काहींनी सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

राज्यातील राजकीय वाऱ्याचा अचूक अंदाज घेण्यात आम्हाला अपयश आले, चित्र कसे राहणार आहे, हे आम्हाला कळलेच नाही. आता पक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, नेत्यांची समजूत घालणे आणि त्यांना पक्षातून बाहेर जाण्यापासून थांबविणे, हे अतिशय अवघड काम असल्याचे मत एका वरिष्ठ नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0