‘दै.मुंबई तरुण भारत’च्या सावरकर विशेषांकांचे लवकरच प्रकाशन

    दिनांक  25-May-2019


 


मुंबई : येत्या २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा ‘कालजयी सावरकर विशेषांक’ चार ठिकाणी प्रकाशित केला जाणार आहे. कल्याण, पनवेल, वसई आणि मालेगावमध्ये विशेषांक आणि तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनी येत्या मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता वसई पश्चिम येथील स्वामी नारायण मंदिर येथे वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक मुकुंद भिडे, ज्येष्ठ वकील अ‍ॅड.राजन जोशी, सनदी लेखापाल उमेश मेस्त्री यांच्या हस्ते ‘कालजयी सावरकर विशेषांक’ व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

 

त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौकातील मराठा मंदिर सभागृह येथे कल्याण जनता बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, उद्योजक मिलिंद कुलकर्णी, भारतीय विचार दर्शनचे विश्वस्त सदानंद फणसे व कर सल्लागार सचिन हेजीब या मान्यवरांच्या हस्ते ‘कालजयी सावरकर विशेषांक’ व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला वक्त्या म्हणून क्रांतिगीता महाबळ उपस्थित असणार आहेत.

 

त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता जुने पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर व रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक विवेक देशपांडे यांच्या हस्ते ‘कालजयी सावरकर विशेषांक’ व पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला वक्ते म्हणून परीक्षित शेवडे उपस्थित असणार आहेत.

 

बुधवारी २९ मे रोजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मालेगाव शहरातील संघचालक अशोक कांकरिया व प्रदीप बच्छाव यांच्या हस्ते ‘कालजयी सावरकर विशेषांक’ व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat