एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड

    दिनांक  25-May-2019नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघीडीच्या (एनडीए) नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित एनडीएच्या बैठकीत मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. बादल यांच्या प्रस्तावाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी अनुमोदन दिले.

 

बादल यांच्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्व नवनिर्वाचित खासदारांनी हात उंचावून मोदी यांच्या नेतानिवडीचे समर्थन केले. यानंतर संपूर्ण साभागृह 'भारत माता की जय' घोषणेने दणाणून गेले. तत्पूर्वी भाजपच्या संसदीय पक्षनेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, मोदी आज संध्याकाळी सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat