ममतांचे सरकार सहा महिन्यात कोसळणार?

    दिनांक  24-May-2019


 


भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचा दावा


पश्चिम बंगाल : पुढील सहा महिन्यात पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचे सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केली. पश्चिम बंगालमधील भाजपच्या घवघवीत यशानंतर मधुपर्णा दास येथे ते माध्यमांशी बोलत होते. ममता बनर्जी पश्चिम बंगालमधील जनतेच्या भावना समजून घेण्यास असमर्थ ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास ममता असमर्थ ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पश्चिम बंगालमधील जनाधार कमी होत चालला आहे. या पतनाला ममता स्वतः जबाबदार आहेत. ही ममतांचा पक्षाच्या शेवटाची सुरुवात असल्याचेही देवधर म्हणाले.


लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये १८ जागा मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावला. या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली ती सुनील देवधर यांनी. पश्चिम बंगाल जिंकायचेच या उद्देशाने पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी देवधर यांना बंगालला पाठवले. देवधर यांनी शाह यांचा विश्वास खरा ठरवत यशस्वी कामगिरी करत ४० टक्के जनाधार भाजपच्या बाजूने वळवला. याच जोरावर भाजपाला १८ जागा जिंकता आल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat