तळकोकणात सेनेचा विजय कसा? ; नारायण राणेंचा सवाल

    दिनांक  24-May-2019रत्नागिरी : महाराष्ट्रामध्ये युती आणि मोदीजींच्या त्सुनामीमध्ये काँग्रेससहित अनेक पक्ष वाहून गेले. त्यामध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्यांदा झालेल्या पराभवानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. "तळकोकणात आम्ही हरलो असलो तरीही पराभव मान्य नाही. कोकणात सेनेचा उमेदवार निवडुन येणे हे संशयास्पद आहे." असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.

 

'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व फेऱ्यांमध्ये ७००० ते ८००० मतांचा फरक कसा दाखवतो?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड नाही हेच संशयास्पद आहे. या निकालावर निवडणूक आयोगाकडे तक्रार विचार करायचा की नाही यावर विचार करुन निर्णय घेणार आहोत." असेही राणेंनी सांगितले.

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. या पराभवामुळे कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसलेला मोठा धक्का आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat