ट्रम्प यांच्यासह अमेरिकन मंत्र्यांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

    दिनांक  24-May-2019 

वॉशिंग्टन : सतराव्या लोकसभा निवडणूकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डोनाल्ड़ ट्रम्प यांनी मोदींना ट्विट करत शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांचे आभार मानले. मोदी-ट्रम्प यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वेळोवेळी यापूर्वीही दिसून आले आहेत.

 

ट्रम्प म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुनरागमन हे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी सुधारण्यास मदत करेल. दोन्ही देशांमधील महत्वपूर्ण कार्य यापुढेही सुरू राहील." यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आभार मानले.
मोदींनी ट्विट करत ट्रम्प यांना धन्यवाद म्हटले, "माझा विजय हा देशातील १३० कोटी लोकांच्या निर्णयाचे प्रतिनिधित्व करतो आहे. आपल्यासोबत असलेल्या चांगल्या संबंधांचा वापर आपण वैश्विक शांती, दोन्ही देशांचे संबंध आणि समृद्धीसाठी करू.", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी ट्विटमध्ये म्हटले कि, "अमेरिकेचे मित्र आणि सहकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे अभिनंदन. भारतातील लोकशाहीसाठी कटीबद्ध असलेल्या प्रत्येक मतदाराचे अभिनंदन, आम्ही सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी काम करण्यासाठी उत्सूक आहोत."

 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. एनडीएच्या अभूतपूर्व यशाबद्दल आणि प्रचंड बहुमताबद्दल भारतीयांचेही अभिनंदन केले. भारताच्या निवडणूका या संपूर्ण जगभरातील लोकशाही देशांसाठी मोठी प्रेरणा असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat