विजय‘स्मृति’

    दिनांक  24-May-2019   हज़ार बर्क़ गिरे लाख आँधियाँ उट्ठें

वो फूल खिल के रहेंगे जो खिलनेवाले हैं

 

साहिर लुधियानवी यांचा हा शेर अमेठीतील स्मृती इराणींच्या विजयाचीच जणू साक्ष देणारा. कारण, काँग्रेसचा एक अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या अमेठीत खुद्द काँग्रेस अध्यक्षांचाच पराभव करण्याचा हा भीमपराक्रम केला स्मृती इराणींनी. जवळपास ५५ हजार मतांनी राहुलला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. अमेठीच्या जनतेने, तब्बल १० वर्षं सहन केलेल्या नाकर्त्या खासदाराला साफ नाकारले. अमेठीवासीयांच्या रोषाचा फटका राहुलला बसला तर, त्याच अमेठीवासीयांच्या प्रेम-आपुलकीमुळे २०१४ साली अमेठीतूनच पराभव पत्कराव्या लागलेल्या स्मृती इराणी यंदा ‘जायंट किलर’ ठरल्या. पण, हा ‘स्मृति’विजयाचा मार्ग निश्चितच प्रशस्त नव्हता. २०१४च्या पराभवानंतर स्मृती इराणी अमेठीमध्ये अधिक सक्रिय झाल्या. त्यांनी नुसते अमेठीचे दौरे केले नाहीत, तर या भागातील पराजयामुळे मरगळ आलेल्या भाजप संघटनाला स्मृतींनी पुनरुज्जीवित केले. अमेठी, अमेठीची संस्कृती, समस्या प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन समजून घेतल्या. राहुल गांधी १० वर्षं खासदार असूनही अमेठीतील रस्त्यांची दुर्दशा, बेरोजगारीची समस्या आणि त्यामुळे दिल्ली, लखनौसारख्या शहरांकडे तरुणवर्गाचे होणारे मोठे स्थलांतर या प्राथमिक आव्हानांवर आता स्मृती इराणींनाही मार्ग शोधावा लागेल. स्मृती इराणींनी अमेठीतीलच पिंडारा ठाकूर हे छोटेसे गाव खासदार दत्तक योजनेअंतर्गत निवडले. पण, अवघ्या काही वर्षांतच या गावाचा कायापालट झाला. ज्या गावात साधे रस्तेही नव्हते, तिथे सिमेंटच्या गल्ल्या आज दिसतात. रस्त्यांवर पथदिवे नसल्याने संध्याकाळी, रात्रीच्या वेळी महिला घराबाहेर पडणे टाळायच्या. म्हणून, सौरउर्जेवर चालणाऱ्या पथदिव्यांनी हे गाव उजळून निघाले. शिवाय, उत्तर प्रदेशातील पहिले डिजिटल खेडे होण्याचा मानही या गावाला मिळाला. इंटरनेट-वायफाय कनेक्शन, पंचायतीतील संगणकीकरण यामुळे एका क्लिकवर ग्रामस्थांना २०६ योजनांचा लाभ आज घेता येतो. या गावाच्या विकासाची ही ख्याती अमेठीभर पसरली. ती लोकांनी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली. त्यामुळे मनावर घेतले की, अल्पावधीत गावाचा कायापालट कसा होतो, याचे हे आदर्श उदाहरण. त्याचेच फळ स्मृती इराणींना अमेठीवासीयांनी मतपेटीतून दिले. त्यांच्याकडून जनतेच्या भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांच्या कसोटीवर स्मृती निश्चितच खऱ्या उतरतील, यात शंका नाही.

 

पराभव‘प्रिया’

 

‘नववधू प्रिया मी बावरतें, लाजतें, पुढे सरतें, फिरतें’

 

या भा. रा. तांबेंच्या नववधूचे वर्णन करणाऱ्या काव्यपंक्तींमध्ये बदल करून- ‘पराजित भगिनी प्रिया मी फसतें, रुसतें, पुन्हा मागे पडतें’ असेच म्हणावे लागेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी आणि पूर्व-उत्तर प्रदेशची जबाबदारी ज्या प्रियांका गांधींवर सोपविण्यात आली, त्यामध्ये त्या सपशेल अपयशी ठरल्या. काँग्रेसला उत्तर प्रदेशातून केवळ रायबरेलीतून सोनिया गांधींच्या रूपाने एकमेव जागा जिंकता आली, जिथे सप-बसपने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१४ साली दोन जागांवर समाधान मानाव्या लागलेल्या काँग्रेसला अमेठीवर पाणी सोडून फक्त रायबरेली खिशात टाकता आले. खरं तर प्रियांकांना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिल्यानंतर जादूच्या छडीप्रमाणे त्या अधिकाधिक जागा जिंकून आणतील, अशी एक हवा काँग्रेसकडून आणि काही माध्यमांतून मुद्दाम निर्माण करण्यात आली. पण, निकालांनंतर ती हवाच काय, साधी झुळूकही नव्हती, असेच म्हणावे लागेल. प्रियांका गांधींचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या चेहरेपट्टीशी असलेले साधर्म्य, लोकांमध्ये अगदी सहजपणे मिसळण्याची अवगत केलेली कला आणि साधेपणा यामुळे उत्तर प्रदेशच्या त्या भाग्यविधाता ठरतील, अशी अपेक्षा काँग्रेसला होती. परंतु, ‘प्रियांका फॅक्टर’ या निवडणुकीत पूर्णत: फोल ठरला. प्रियांका गांधींना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झाले नाहीच, उलट अमेठीमध्येही भावासाठी मतांचा जोगवा मागणाऱ्या प्रियांकाला मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. खरंतर यापूर्वीच्या कित्येक निवडणुकांमध्ये प्रियांकाने काँग्रेसचा प्रचार केला होता. तेव्हाही त्याचे मतरूपी परिणाम दिसून आले नव्हतेच आणि यंदा तर मोदींच्या त्सुनामीत प्रियांकाचा उरलासुरला करिष्माही झाकोळला. पण, काही माध्यमांनी रंगवलेल्या अतिरंजित चित्रामुळे प्रियांका गांधी तर थेट वाराणसीतही मोदींविरोधात विजयश्री खेचून आणतील, इतपत अकलेचे तारे तोडले होते. पण, काँग्रेसच्या उरल्यासुरल्या सद्सद्विवेकबुद्धीमुळेच म्हणा हवं तर, प्रियांका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत. असो. प्रियांका गांधींकडे ‘काँग्रेस की कल की किरण’ म्हणून पाहणाऱ्यांनी तरी आता डोळे उघडावे आणि गांधी घराण्याचा गजर बंद करावा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat