पुत्री श्रद्धा अन् पिता श्रीराम मांडले यांचे पुनर्निर्माण

    दिनांक  24-May-2019'जुने ते सोने' या म्हणीप्रमाणे श्रीराम मांडले यांनी जुन्या काष्ठाच्या टेक्स्चरचाही चपखलपणे विचार करून विषयाचे माध्यम निश्चित केले.


मुंबई नगरीच्या कलाप्रवाहातील कला दालनांमध्ये ज्या नेहमीच्या शैलीतील कलाकृती प्रदर्शित झालेल्या पाहायला मिळतात, त्या स्मृतिप्रवण असतातच. परंतु, दि. ३ ते ९ जूनच्या सप्ताहात काही अद्भुत अशा कलाकृती पाहायला मिळणार आहेत. प्रथितयश कलाकार...!! 'कलाकार' हा शब्द मुद्दाम उपयोगात आणावा लागतो आहे. कारण, कलाकृती पाहिल्यावर या कलाकारास 'आर्टिस्ट' म्हणावे, 'चित्रकार' म्हणावे, 'पेंटर' म्हणावे की, 'क्राफ्टस्मन' म्हणावे, असे प्रश्न पडतात. (ते 'ideas @ work' मध्ये कलादिग्दर्शक आहेत) श्रीराम मांडले यांची भेट खास ठरलेल्या ठिकाणी झाली. मित्रवर्य राजेंद्र गोळे (जगप्रसिद्ध पेपर स्कल्पटर) यांनी ही भेट घडवून आणली होती. श्रीराम मांडले हे सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट या मुंबईच्या कला महाविद्यालयाचे विद्यार्थी. पूर्वीच्या अभ्यासक्रमाला 'कमर्शियल आर्टिस्ट' म्हटलं जायचं. आता 'उपयोजित कला'कार म्हणतात या कलाक्षेत्राला...!! श्रीराम मांडले यांना मी 'उपयोजित कलाकार'च म्हणेन. आहेतच ते शिक्षणाने, परंतु त्यांच्या कलाकृती पाहिल्यावर हा शब्द अधिकच योग्य वाटतो त्यांच्यासाठी. असो.

 

प्रस्तावना फारच लांबट नको म्हणून थांबतो. आता त्यांच्या कलाकृतींविषयी...

 

त्यांच्या या प्रदर्शनाचं शीर्षक आहे 'Bombaim Resurgence.' हे 'बॉबींम रिसर्जन्स' म्हणजे जुन्या परंतु स्मृतिप्रवण आठवणींनी युक्त वस्तूंचं पुनर्निर्माण करणं. जरा हटके आहे हे. पण थक्क करणारं देखील!! श्रीराम मांडले यांना त्यांच्या 'कल्पना विस्तारांना' जाहिरात संस्थांमधील मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. गेल्या तीन वर्षांत तर त्यांनी अशा पुरस्कारांवर स्वत:चे नावच कोरलेले आहे. नव्हे, तसे भाग पाडले संबंधितांना. त्यांनी या कलाकृती बनविताना असाच काहीसा, कदाचित एकमेव ठरेल, असा तांत्रिक प्रकार योजून 'काष्टपेंटिंग्ज' साकारलेत. निसर्गातील खास सागवानाच्या वाळलेल्या काष्ठांचा उपयोग करून त्यांनी मुंबईतील पुरातन जुन्या वस्तू आणि वास्तूंच्या 'हाफ रिलीप' किंवा अर्धउठावा मध्ये 'लेसर कटिंग'च्या तंत्राचा उपयोग करून दोनहून अधिक स्तरांमध्ये काम केलं आहे. हे कार्विंगचे काम अत्यंत सूक्ष्म, अभ्यासपूर्ण संदर्भांसह साकारलेले असल्यामुळे त्यांची प्रत्येक कलाकृती अत्यंत अद्भुत आणि थक्क करणारी आहे, हे पाहणाऱ्या रसिकाला मान्य करावेच लागते. 'जुने ते सोने' या म्हणीप्रमाणे श्रीराम मांडले यांनी जुन्या काष्ठाच्या टेक्स्चरचाही चपखलपणे विचार करून विषयाचे माध्यम निश्चित केले.

 

 
 

विषय माध्यमासाठी मुंबईतील जुने वास्तू प्रकार निवडून त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. त्यांच्या आकारातील सौंदर्य शोधले आणि मग जे निर्माण झाले, ते केवळ या लेखातील कलाकृतींचे फोटो पाहून कळणार नाही...तर समक्ष भेट देऊनच पाहावे, असे हे काम आहे. या प्रदर्शनाची आणखी एक बाजू आहे. श्रीराम मांडले यांची नुकतीच कलाशिक्षण पूर्ण करून कलाक्षेत्रात येत असलेली कन्या श्रद्धा श्रीराम मांडले हिच्याही कलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या आहेत. विषय वडिलांच्या पायावर पाय ठेवूनच निवडलेला असल्याने प्रभावी आहेच, तथापि तिने निवडलेले माध्यम हे अ‍ॅक्रेलिक वा तैलरंग यातील आहे. 'कानातला मळ काढणारा,' 'मच्छीविक्रेती,' 'पेंटर-साईन बोर्ड पेंटर,' 'बुट पॉलिशवाला' असे मुंबापुरीच्या हातावर पोट असलेल्यांना मोठ्या श्रद्धेने या नवकलाकर्तीने चितारले आहे. एकूणच पुनर्निर्माणाचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे. हे प्रदर्शन जहांगीर कला दालनाच्या हीरजी गॅलरीत दि. ३ ते ९ जूनच्या सप्ताहात पाहायला मिळेल.

 

- प्रा. गजानन शेपाळ

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat