समुद्रसोबती...

    दिनांक  24-May-2019


 

 'वन्यजीवप्रेमी'प्रमाणे आता लोक स्वत:ला 'सागरीजीवप्रेमी'ही म्हणू लागले आहेत. सागरी परिसंस्थेमधील जीवांविषयी लोकमनात नवचेतना जागृत करण्याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे प्रसिद्ध सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे यांना जाते.

 
 मुंबई ( अक्षय मांडवकर) : बऱ्याच लोकांना जंगलात फिरण्याची, तिथले पर्यावरण समजून घेण्याची आणि त्या पर्यावरणात वावरणाऱ्या प्रजातींच्या निरीक्षणाची आवड असते. परंतु, एका 'माणसा'ने लोकांना त्यांची ही आवड बदलण्यास भाग पाडले. कारण, जंगलांमधून त्यांना हा माणूस थेट समुद्रकिनाऱ्यांवर घेऊन आला. त्यांची तिथल्या पर्यावरणात दडलेल्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या छोट्या-छोट्या जीवांशी ओळख करून दिली. त्यासाठी समाजमाध्यमासारख्या प्रभावी शस्त्राचा वापर केला. सुरुवातीला केवळ 'भटकंती' म्हणून त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेने आता सागरी जीव संशोधन क्षेत्रात लोकचळवळीचे रूप धारण केले आहे. या लोकचळवळीचे नाव आहे, 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' आणि त्या माणसाचं नाव, 'प्रदीप पाताडे'.
 

 
 
 

प्रदीप पाताडे यांचा जन्म १५ मार्च, १९६८ सालचा. मुंबईतील गिरगावात त्यांचे बालपण गेले. तिथपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गिरगाव चौपाटीवर त्यांचे येणे-जाणे होतेच. त्यामुळे बालपणीपासूनच समुद्रकिनारा, तिथला प्रत्येक घटक त्यांच्या ओळखीचा. दहावीनंतर ट्रेकिंगला जाण्यास सुरुवात केल्यावर त्यांना हळूहळू निसर्गप्रेमाची आवड जडू लागली. पुढे ९०च्या दशकात त्यांनी एका मोठ्या वृत्तपत्र समूहात नोकरीला सुरुवात केली. त्याच दरम्यान त्यांना गिरगाव चौपाटीवर असलेल्या 'मफतलाल बोट क्लब'चे सदस्यत्व मिळाले. पुन्हा समुद्राशी जवळीक निर्माण झाली. नोकरी सांभाळून शनिवार-रविवारच्या सुट्टीत पाताडे या क्लबमध्ये बोटिंग-रोईंगचे प्रशिक्षण घेऊ लागले. कालांतराने याच क्लबमध्ये त्यांनी आपल्या सुट्ट्यांच्या दिवसांत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. असे सगळे साधारण २००९ पर्यंत सुरू होते. मात्र, त्या दरम्यानच्या कालावधीत त्यांचे समुद्राशी असणाऱ्या ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत झाले. सागरी परिसंस्थेतील प्रत्येक घटकाशी त्यांची हळूहळू ओळख निर्माण झाली. २००९ मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे 'वॉटर स्पोर्ट्स' प्रशिक्षण क्षेत्रात उडी घेतली. 


 
 
 
दरम्यानच्या काळात पाताडे धारावीमध्ये वास्तव्यास आले. 'वॉटर स्पोर्ट्स'चे प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी संस्थेत ते रूजू झाले. त्यांच्या माध्यमातून भारतभर फिरले. या सगळ्यात घरापासून जवळच असणाऱ्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात ते वरचेवर पक्षी आणि फुलपाखरू निरीक्षणाकरिता फेरफटका मारत. २०१३ मध्ये गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आलेल्या गणेशभक्तांना 'स्टिंग-रे' या सागरी जीवाचा दंश झाला. पाताडे त्यावेळी किनाऱ्यावरच होते. लोक वेदनेने कळवळत होते. मात्र, त्यावेळी कोणालाच या दंशावरील प्रथमोपचार माहिती नव्हते. पाताडेंनी लगेच सागरीजीवतज्ज्ञांशी संपर्क साधला. मात्र, या जीवाच्या दंशावर कोणते उपाय करावे, याची त्या तज्ज्ञांनाही कल्पना नव्हती. पाताडे सांगतात की, “ही घटना मला सागरी जीवांच्या निरीक्षणाचे काम करण्यास कारणीभूत ठरली.” त्यानंतर त्यांनी किनाऱ्यांवरील छोट्या दुर्लक्षित सागरी जीवांच्या निरीक्षणाचे काम सुरू केले. मात्र, त्यांना कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. तसेच त्यांनी हे काम आणि त्याच्या भविष्यासंबंधी कोणताच विचार केला नव्हता.
 

 
 
 गिरगाव चौपाटीवर अर्धे आयुष्य गेल्याने त्यांनी या कामाला तिथपासूनच सुरुवात केली. गळ्यात कॅमेरा अडकवून ते किनारा फिरायला लागले. त्या ठिकाणी दिसणाऱ्या प्रत्येक सूक्ष्म जीवांचा अधिवास आणि त्याची शारीरिक रचना याचे निरीक्षण करून त्याचे छायाचित्र टिपू लागले. आपल्या वैयक्तिक फेसबुक पेजवरून 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' या वाक्याखाली त्यांनी ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्यास सुरुवात केली. केवळ छायाचित्र टाकू नका, त्याबरोबर त्या जीवाची माहितीही टाकत जा, अशी विचारणा वाढू लागली. मात्र त्यासंबंधीची शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्याने पाताडेंची पंचाईत झाली. अशा वेळी त्यांची ओळख सागरी जीवशास्त्रज्ञ असलेल्या अभिषेक जमालाबाद आणि सिद्धार्थ चक्रवर्ती यांच्याशी झाली आणि या तिघांनी मिळून २०१७ मध्ये 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' असे स्वतंत्र फेसबुक पेज काढले. त्यात छायाचित्र आणि त्या जीवाची शास्त्रीय माहिती अशा दोन्ही गोष्टी दिल्या. त्यामुळे या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मंडळींमध्येही त्याचे आकर्षण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच जनसामान्य आणि वन्यप्रेमींमध्ये निर्माण झालेले हे आकर्षण शमविण्याचे काम 'मरीन वॉक' या उपक्रमाने केले. आपण एकटेच किनारा फिरून या जीवांना पाहतो, त्याची माहिती गोळा करतो. याउलट सगळ्यांसमवेत आपण मुंबईचे किनारे फिरलो तर, लोकांना या जीवांनाही पाहता येईल आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या विषयाचे प्रबोधनही होईल, या हेतूने पाताडे यांनी 'मरीन वॉक' उपक्रमाला सुरुवात केली. आज लोकांमध्ये जंगलात फिरण्याइतकेच 'मरीन वाॅक'चे आकर्षण निर्माण झाले आहे. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतो आहेच. परंतु, या उपक्रमाने आजतागायत दुर्लक्षित राहिलेल्या किनाऱ्यावरील छोट्या जीवांच्या संशोधन आणि निरीक्षण क्षेत्रासंंबंधी प्रबोधन करण्याचे काम अप्रत्यक्षरित्या केले आहे. 'मरीन लाईफ आॅफ मुंबई'ने मुंबईच्या किनाऱ्यांवर केलेेल्या ३४२ सागरी जीवांच्या नोंदीला आंतराष्ट्रीय 'आय नॅचरलिस्ट' या संकेतस्थळाने मान्यता दिली आहे. पाताडे यांच्यासोबत आज अनेक स्वयंसेवक जोडले गेले असून शौनक मोदी, गौरव पाटील आणि सेजल मेहता या स्वयंसेवकांनी 'मरीन लाईफ आॅफ मुंबई' या उपक्रमाला नव्या स्तरावर घेऊन जाण्याचे काम केले आहे. सागरी परिसंस्थेसंबंधीच्या या लोकचळवळीला आज वन विभागाच्या कांदळवन कक्षाने देखील मान्यता दिली आहे. या मोहिमेच्या आधाराने सुरू झालेली 'मरीन रिसपाॅन्डेन्ट' ही मोहिम सागरी जीव बचावाच्या कामात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे सागरी परिसंस्थेतील जीवांविषयी प्रत्येक निसर्गप्रेमीच्या मनात नवचेतना निर्माण करणाऱ्या या मोहिमांच्या केंद्रस्थानी केवळ एका माणसाचे नाव आहे, ते नाव म्हणजे 'प्रदीप पाताडे'. त्यांना पुढील वाटचालीकरिता 'दै. मुंबई तरूण भारत' कडून शुभेच्छा ! 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat