वारसा आणि समकालीन महत्त्व यांचे प्रतिनिधीत्व करणारे भारतातील पहिले संग्रहालय नाशिकमध्ये

    दिनांक  24-May-2019   


 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १९२० मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पायाभरणी केलेल्या पंम्पिंग स्टेशन, गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डिंग येथे मागील तीन वर्षांपासून संग्रहालय उभारणीचे काम सुरू आहे. संस्थेच्या या संग्रहालयाद्वारे भारतीय शिक्षण प्रशिक्षण विकास, स्थानिक व ग्रामीण शाळांचा उदय व इतिहास, भारतीय शालेय इतिहासाची उत्क्रांती आणि शाळा प्रायोजक शैक्षणिक वारसा संपत्ती आदी विषयांवर वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शने भरविण्याचा मानस आहे.अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले नाशिक हे स्वत:च एक संग्रहालय आहे. प्राचीन संस्कृती आणि इतिहास मनापासून जपणारे नाशिक विविध अंगांनी समृद्ध आहे. ऐतिहासिक शिल्प, वारसा, नाणी, प्राचीन मानवी हत्यारांपासून युद्धातील हत्यारांपर्यंत तसेच वेगवेगळ्या छंदांपासून पोथ्यांपर्यंतचा अनमोल ठेवा आतापर्यंत नाशिकमधील विविध संग्रहालयांनी आणि हौशी नागरिकांनी मनापासून जपून ठेवला आहे. आता विश्वाचा तसेच भारतीय शैक्षणिक संस्कृतीचा वारसा आपण कसे पुढे घेऊन जात आहोत, हे दाखविणारे अनोखे संग्रहालय नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्था ‘भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय’ या रूपाने साकारत आहे. हे संग्रहालय गंगापूर रोड येथील उदोजी मराठा बोर्डिंग येथे आकाराला येत असून शतकापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे ‘भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय’ उभारण्यात येणार आहे.

 

१९२० मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पायाभरणी केलेल्या उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये संग्रहालयाचे कामकाज आता सुरू झाले आहे. भारतातील शिक्षण, संस्कृती आणि शिक्षणाच्या विकासाशी संबंधित साहित्याचे प्रदर्शन, संरक्षण, जतन व संशोधन येथे करण्यात येणार आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये या संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस व भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालयाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षा नीलिमा पवार, संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष भुजंगराव बोबडे यांच्या नेतृत्वात हे संग्रहालय आकारास येत आहे. या संग्रहालयाचे एकूण तीन विभाग असून पहिल्या विभागात जगाचा, दुसऱ्या विभागात देशाचा शैक्षणिक इतिहास मांडण्यात येणार आहे, तर तिसऱ्या विभागात संस्थेचा चित्ररूपी इतिहास रेखाटण्यात येणार आहे. संग्रहालयाविषयी माहिती देताना नीलिमा पवार सांगतात की, जगभरात एकूण आठ शैक्षणिक संग्रहालये आहेत. त्यापैकी वारसा (संस्कृती) आणि समकालीन महत्त्व यांचे प्रतिनिधीत्व करणारी फक्त दोनच संग्रहालये आहेत. मविप्र संस्थेने स्थापन केलेले जगातील हे तिसरे व भारतातील पहिलेच संग्रहालय ठरणार आहे.

 

या संग्रहालयात काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कलाकृती संकलित केल्या आहेत. या संकलनामध्ये शैक्षणिक व हस्तलिखित साधने, पुस्तके, पारितोषिके, प्रमाणपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्रे आणि इतर दुर्मीळ बाबींचा समावेश केलेला आहे. ऐतिहासिक मूल्य व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या कलाकृती भारतीय शैक्षणिक परंपरेला उजाळा देण्याकरिता भावी पिढीसाठी जतन करण्यात येणार आहेत. मविप्र भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालयासाठी शैक्षणिक व हस्तलिखित साधने, पुस्तके, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कलाकृती संकलित करण्याचे काम सुरू असून यासाठी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभला आहे. जळगाव येथील रहिवासी असलेले दामोदर इंगळे यांनी १९६० सालापासून संकलित केलेली ७८ हजारहून अधिक विविध महत्त्वपूर्ण संदर्भ असणारी बटणे सुपूर्द केली आहेत. यात विविध धातूंची, लाकडाची, रेशीम, हस्तिदंत, तांबे, पितळ, गनमेटल, चांदी, सोने, विविध प्रकारचे दगड, रोल्डगोल्ड तसेच जगातील ३४ पेक्षा अधिक देशांचे राष्ट्रध्वज किंवा राजघराण्याचे प्रतीक असलेले बटण यांचा समावेश आहे.

 

तसेच, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, द. आफ्रिका, जपान, चीन, यांसारख्या देशांच्या बटणांचादेखील समावेश आहे. अलेक्झांडरपासून राणी व्हिक्टोरियाची मुद्रा असलेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरख्यावरील बटण, अष्टदिशादर्शक बटण, ज्वालामुखी बटण, संत ज्ञानेश्वरकालीन बटण यांचादेखील यात समावेश आहे. तर, नाशिक येथील रहिवासी असलेल्या कल्पना विजय कुशारे यांनी गेल्या दहा वर्षांपासून जोपासत असलेल्या छंदाच्या माध्यमातून देशभरातील विविध भाषांच्या मुळाक्षरांपासून तयार केलेल्या डिझाईन्सचे कलेक्शन त्यांनी मविप्र भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालयाकडे सुपूर्द केले आहे. यात प्राचीन लिपीतील ब्राह्मी, मोडी, पाली यासोबतच गुजराती, कोंकणी, मगधी, संथाली, पंजाबी, काश्मिरी, तेलुगू, कन्नड, मल्याळम, तामिळ, नेपाळी आदी भाषांमधील मुळाक्षरांपासून विविध डिझाईन तसेच चित्रलिपी यांचा समावेश आहे. तसेच अक्षरांपासून डिझाईन तयार केलेले ’अक्षरसौंदर्य’ नावाचे पुस्तकदेखील त्यांनी यावेळी संग्रहालयास प्रदान केले आहे. नागरिकांना आपल्या प्रांताचा इतिहास, पुरातन संस्कृती, रुढी-परंपरा अभिज्ञात व्हाव्यात आणि इतिहासकालीन वस्तूंचा ठेवा जतन व्हावा, या उद्देशाने संग्रहालयांची निर्मिती करण्यात येत आहे.

 


संग्रहालयाचे प्रस्तावित उपक्रम

 

विविध अभ्यासक्रम सुरू करणे जसे मोडी लिपी, ब्राह्मी लिपी. ऐतिहासिक वास्तू व वस्तू यांचे जतन संवर्धनासाठी ज्ञान देणारे वर्ग सुरू करणे. ऐतिहासिक वस्तू, कलाकृती आदींचे प्रदर्शन भरविणे. लोककला, विधीनाट्ये व भाषिक चिन्हे आदी जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणे.

 

भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालयाची वैशिष्ट्ये

 

> जगातील तिसरे व भारतातील पहिले शैक्षणिक संग्रहालय (ग्रीस आणि हाँगकाँगनंतर).

> जगभरात एकूण आठ शैक्षणिक संग्रहालये आहेत. त्यापैकी वारसा (संस्कृती) आणि समकालीन महत्त्व यांचे प्रतिनिधित्व करणारे हे तिसरे संग्रहालय.

> प्रातिनिधिक चार विभाग करून जागतिक, भारतीय, महाराष्ट्र तसेच मविप्रच्या वाटचालीचा प्रवास

> जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक कलाकृती शैक्षणिक व हस्तलिखित साधने

> संशोधनपर प्रबंध प्रशस्त ग्रंथालय व ७३ लाख ई- बुक २८ लाख पानांचा हस्तलिखितांचा डेटा

> ४० हजार पीएच.डीचे शोधप्रबंध

> ऐतिहासिक दस्तऐवज छायाचित्र व अन्य दुर्मीळ बाबी

> प्रशिक्षण केंद्र

> जुनी पुस्तके, पारितोषिके, प्रमाणपत्रे

> अ‍ॅम्फी थिएटर, वाचनालय, उपाहारगृह, ग्रंथ शिल्प

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat