'माउंट एव्हरेस्ट'वर अकलूजच्या पुत्राचा मृत्यू

    दिनांक  24-May-2019मुंबई : 'माउंट एव्हरेस्ट'च्या मोहिमेवर गेलेल्या मुळचा अकलूजचा असलेल्या निहाल बागवान याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एव्हरेस्ट शिखर सर करून भारताचा झेंडा फडकवून परतीच्या मार्गावर असताना त्याचा मृत्यू झाला. आठवड्याभरात तीन भारतीय गिर्यारोहकांसोबतच एकूण आठ जणांचा एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. चावर हवेतील ऑक्सिजन विरळ होत असताना निहाल बागवान हा एव्हरेस्टवरून खाली परतणाऱ्या 'ट्राफिक जाम'मध्ये अडकला. त्याच्यासोबत असणाऱ्या शेरपांनी त्याला कॅम्प ४ पर्यंत कसेबसे आणले. परंतु, एव्हाना निहालला श्वास घेणंही कठिण झाले होते. कॅम्प ४ वरच त्याने अखेरचा श्वास घेतला.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे-जून महिन्यामध्ये नेपाळमध्ये एव्हरेस्ट मोहिमेसाठी ४४ टीममधील एकूण ३८१ जणांना परवाने दिले गेले आहेत. यासाठी प्रत्येकाकडून ११,००० डॉलर म्हणजेच अंदाजे ७,६६,३५९ रुपये एवढी रक्कम घेतली जाते. जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'च्या आकर्षणामुळे इथे दाखल होणाऱ्या गिर्यारोहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे 'ट्राफिक जाम'ची समस्या दिसून येते. सध्या एव्हरेस्टवर एकाच वेळी २०० हून अधिक गिर्यारोहक आपली मोहीम पूर्ण करताना दिसत आहेत. या सीझनमध्ये आत्तापर्यंत १५ गिर्यारोहकांनी आपले प्राण गमावलेत.

 

मुंबईच्या अंजली कुलकर्णी आणि कल्पना दास यांचाही 'ट्रॅफिक जाम'मुळे मृत्यू

 

गुरुवारी २३ मे रोजी कल्पना दास या ५२ वर्षीय भारतीय महिलेचाही एव्हरेस्टवर प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला होता. त्याअगोदर बुधवारी, मुंबईच्या रहिवासी ५५ वर्षीय अंजली कुलकर्णीही एव्हरेस्टवरच्या याच 'ट्राफिक जाम'च्या बळी ठरल्या. परतीच्या वाटेवर असताना अंजली यांचा पाय घसरून त्या जखमी झाल्या. त्यानंतर कॅम्प ४ वर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अंजली यांच्यासोबत त्यांचे पती शरद कुलकर्णीदेखील एव्हरेस्ट मोहिमेवर होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat