निष्प्रभ ठरली तारांगणे; राज, प्रियांकाची जादू चाललीच नाही

    दिनांक  23-May-2019मुंबई : निव्वळ व्यक्तीद्वेषातून राजकारणात काहीच साध्य होत नाही, हे आजच्या निकालांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता त्वेषाने निवडणूक लढविण्याचा विक्रमी प्रयत्न यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. त्यांच्या सभांना नेहमीप्रमाणे गर्दीही झाली. परंतु, नेहमीप्रमाणेच या गर्दीचा कोणताही परिणाम मतदानावर झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांना सत्तेवरून हटवा,” असा विखारी प्रचार राज यांनी केला होता. पण त्यांच्या या आवाहनाला लोकांनी अजिबात प्रतिसाद दिला नसल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

 

विरोधकांनी भाजपप्रणित रालोआविरुद्ध एल्गार पुकारला असताना त्याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रात रालोआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. महाराष्ट्रात राज ठाकरे यांची साथ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला फायदेशीर ठरेल, अशी शक्यता होती. निकालात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी मोठे अपयशच पडले आहे. राज ठाकरे यांची राजकीय गणिते याआधी बऱ्याचवेळा चुकली आहेत.

 

आताही राज राजकीय गणित मांडण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरल्याने त्याचा फटका त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी भाजपविरोधात व काँग्रेसच्या बाजूने या निवडणुकीत घाम गाळला. असे असतानाही मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसने नाक मुरडले होते. आता तर राज यांच्या प्रचाराचा कोणताच फायदा आघाडीला झाला नसल्याचे समोर आल्याने काँग्रेस त्यांना आघाडीपासून दूर लोटणारच आहे. त्यामुळे राज पुन्हा एकदा एकटे पडले आहेत.

 

प्रियांकांची जादू चाललीच नाही

 

उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्वातील आघाडीने ज्याप्रकारे यश मिळवले ते पाहता दिल्लीचा राजमार्ग जिथून जातो, असे म्हणतात त्या राज्यात काँग्रेसची कामगिरी अगदीच सुमार झाल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे काँग्रेसने ब्रह्मास्त्र वगैरे म्हणत ज्या प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशाच्या रणात उतरवले, तिथे त्यांची जादू चाललीच नाही.

 

काँग्रेसला इथे केवळ २ जागा मिळवता आल्या. भाजप आघाडीला ६० आणि सपा-बसपा महागठबंधनला १८ जागा मिळवता आल्या. परंतु, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने ज्या प्रियांका गांधींना राजकारणात आणले, सरचिटणीस पद दिले आणि पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली, तिथे फायदा होईल, असे म्हटले गेले, तिथेच त्यांची हवा गेल्याचे दिसते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat