Live Update: पवार घराण्याला मोठा धक्का, पार्थ पवार मोठ्या पराभवाच्या दिशेने

    दिनांक  23-May-2019
पुणे : पुणे जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेला संमिश्र यश मिळताना दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट, मावळमधून श्रीरंग बारणे व शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आहे.

 

मावळ

 

मावळ लोकसभा मतदारसंघातून पवार घराण्याला मोठा धक्का बसला असून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मोठ्या पराभवाच्या दिशेने आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. बारणे हे तब्बल १ लाख ५१ हजार ३७४ मतांनी आघाडीवर आहेत. पार्थ पवार यांना ३ लाख १९ हजार ५९७ मते मिळाली असून बारणे यांना ४ लाख ७० हजार ९७१ मते मिळाली आहेत.

 

बारामती 

 

बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपच्या कांचन कुल व राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत असून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीला कांचन कुल यांनी आघडी मिळवली होती मात्र नंतर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा आघाडी मिळवली. दरम्यान, सुळे या ७९ हजार ७२२ मतांनी आघाडीवर असून सुळे यांना ३ लाख ९० हजार ८९६ मते मिळाली आहेत. तर कुल यांना ३ लाख ११ हजार १७४ मते मिळाली आहेत.

 

शिरूर

 

शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधलेले डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील बहुचर्चित लढतींपैकी शिरूरची लढत मानली जात होती. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व डॉ. कोल्हे यांच्यात थेट लढत असून २० हजार ५४ मतांनी आघाडीवर आहेत.

 

पुणे

 

पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे गिरीश बापट व काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात थेट लढत असून बापट हे ५३ हजार ७५५ मतांनी आघाडीवर आहेत. बापट यांना १ लाख १३५ मते मिळाली असून जोशी यांना अवघी ४६ हजार ३८० मते मिळाली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat