पालघर लोकसभा मतदारसंघ

    दिनांक  23-May-2019
 


पालघर या वनवासीबहुल जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी वनवासी उमेदवारांचेच प्राबल्य आहे. या लोकसभा निवडणुकीत तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले होते. शिवसेनेकडून राजेंद्र गावित विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव अशी जोरदार लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली. बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह गोठविण्यात शिवसेना-भाजपला जरी यश आले असले तरी नव्याने मिळालेले रिक्षा हे चिन्ह सुद्धा मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी बहुजन विकास आघाडीने प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली होती. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या मतदारसंघाची चर्चा होती. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
, जनता दल आदी पक्षांसोबत महाआघाडी करत भाजप महायुतीच्या उमेदवाराच्या नाकीनऊ आणले होते. पालघर लोकसभा मतदारसंघातील एकूण १८ लाख, ८५ हजार, २९७ मतदारांपैकी १२ लाख, एक हजार, २९८ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यामध्ये ६ लाख, ४१ हजार, १५३ पुरुष, ५ लाख, ६० हजार, ११८ महिला तर १११ पैकी २४ जणांनी मतदान केले होते. शिवसेना-भाजप युतीची देशात, राज्यात व जिल्ह्यात सत्ता असल्याने याचा फायदा आपल्याला नक्की होईल, असे उमेदवार राजेंद्र गावित यांना वाटत होते. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील तळागाळातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व महायुतीच्या इतर कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेत गावित यांना विजयी केले. पालघर बोईसरप्रमाणेच बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या नालासोपारा विभागातून राजेंद्र गावित यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. वसई तालुक्यतील कॅथलिक समाजाचीही मते मिळविण्यात बविआ अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.

 
शहरी भागातील मतदारांचा आणि वाढीव मतांचा फायदाही महायुतीला मिळाला. विक्रमगड आणि डहाणू भागातून बहुजन विकास आघाडीला चांगली लीड मिळाली असली तरी नालासोपारा, सफाळे, केळवे, पालघर, बोईसर आदी भागांत बविआला मोठा फटका पडल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यातून जवळपास ३० हजारांच्या आसपास नोटाला पसंती देत मतदारांनी आपली नाराजी दाखवून दिली. आता इतक्या मोठ्या प्रमाणात नेमकी कोणत्या पक्षाला नाराजी मिळाली, हे आगामी काळात कळेलच. मात्र जिल्ह्यातील सुशिक्षित नागरिकांनी नोटाचा पर्याय स्वीकारत मतदान करून प्रत्येक पक्षाला भविष्यात विचार करायला लावेल, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने पूर्वजांच्या पुण्याईवर निर्भर न राहता आपली चूक लक्षात घेऊन त्यावर सुधारणा करून जास्तीत जास्त जनसंपर्क वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

- नवीन पाटील

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat