पुन्हा एकदा मोदीच!

    दिनांक  23-May-2019नवी दिल्ली : अवघ्या देशाचेच नव्हे तर जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायाचे लक्ष लागलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर होताच, मतदारराजाने मोदीपर्वावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वातील रालोआने राहुल गांधींच्या काँग्रेस आघाडीला, मायावती-अखिलेश यांच्या महागठबंधनला, ममता बॅनर्जींच्या आक्रस्ताळेपणाला धोबीपछाड देत दणदणीत बहुमतासह दिल्लीचे सिंहासन पुन्हा एकदा पादाक्रांत केले.

 

लोकसभेच्या ५४२ पैकी २८० जागांवर भाजपने विरोधकांचा थेट धुव्वा उडवला तर रालोआने एकूण ३४८ इतक्या जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे काँग्रेसला केवळ ५० जागा तर संपुआला ९२ जागांवर विजय मिळाला. परिणामी काँग्रेसला एकूण ५४३ जागांपैकी १० टक्के म्हणजे ५५ जागा जिंकता न आल्याने आता तो पक्ष गेल्या पंचवार्षिकप्रमाणे याहीवेळी विरोधी पक्षनेतेपदाला मुकणार, असे दिसते. दुसऱ्या बाजूला भाजपच्या विजयाने केवळ भाजप नेते, कार्यकर्ते, समर्थकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही आनंदरंगात न्हाऊन निघालेले चित्रही सर्वत्र दिसले. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालय, मुंबईतील प्रदेश कार्यालयासह देशभरातील ठिकठिकाणच्या भाजप कार्यालयात, उमेदवारांच्या मतदारसंघात लाडू, पेढे, मिठाईचे वाटपही करण्यात आले.

 

दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजपचा संदेश घरोघरी पोहोचवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक केले आहे. सोबतच भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाहीने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला आहे आणि हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या चाणाक्ष व सक्षम नेतृत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी दिली. ऐतिहासिक विजयाबद्दल रालोआवर अभिनंदनाचा वर्षाव करणारे अनेक ट्विट्स राजनाथसिंह यांनी आज केले. देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा रालोआला भव्य असा कौल दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर आणि नवभारताच्या उभारणीसाठीच त्यांनी रालोआसाठी मतदान केले आहे, असे त्यांनी यात नमूद केले.

 

महाराष्ट्रात युतीचाच बोलबाला

 

राज्यातही भाजप, शिवसेना, रिपाई(आ), रासप युतीने भक्कम आघाडी घेत ४१ जागांवर विजयी ध्वज फडकावला. भाजपला २३ तर शिवसेनेला १९ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला केवळ एक व राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. दुसरीकडे निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलेली हवा आणि प्रचाराच्या काळात मनसेप्रमुख राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत घेतलेल्या सभांचा महाराष्ट्रातल्या मतदारांवर प्रभाव पडल्याचे दिसले नाही. उलट मतदारांनी वंचित बहुजन आघाडी, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधकांना धूळ चारत भाजपच्याच पारड्यात मतांचे दान टाकले.

 

मोदींनी केली इंदिराजींची बरोबरी

 

जवाहरलाल नेहरुंनी सलग तीन वेळा आणि इंदिरा गांधींनी सलग दोन वेळा काँग्रेसला पूर्ण बहुमताने निवडून आणत सरकार स्थापन केले होते. नेहरुंनी १९५२, १९५७ आणि १९६२ ची निवडणूक जिंकली होती, तर इंदिरा गांधींनी १९६७ आणि १९७१ची निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकली होती. आजच्या विजयामुळे नरेंद्र मोदींनी आता इंदिरा गांधींची बरोबरी केली आहे. २०१४ साली मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. यंदाही भाजपने जवळपास तितक्याच म्हणजे २८० जागा जिंकल्या आहेत.

 

विजयी भारत; नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

 

लोकसभेत भाजप आणि रालोआच्या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा विजय भारताचा आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत. असे ट्विट करत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्याच बरोबर त्यांनी जगमोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

आधारहीन राजकारणाविरोधात कौल

 

’विरोधी पक्षांनी केलेला दुष्प्रचार, खोटे-व्यक्तिगत आरोप आणि आधारहीन राजकारण यांच्या विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल आहे.’ अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. ’पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या आणि राष्ट्रवादाच्या राजकाणाला लोकांनी कौल दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात स्मृतींची मुसंडी

 

अमेठी लोकसभा मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजला जातो. पण यावेळी इथून विजयाची खात्री नसल्यामुळे राहुल गांधींनी अमेठीबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. कारण वायनाडच्या तुलनेत अमेठीमध्ये भाजपनेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी राहुल गांधींसमोर मोठे आव्हान निर्माण केले आणि हे आव्हान खरे असल्याचे आजच्या मतमोजणीनंतर सिद्ध झाले. इथे स्मृती इराणींनी राहुल गांधींचा ३० हजार मतांनी पराभव करत जोरदार मुसंडी मारली आहे. हा पराभव राहुल गांधींसाठी धक्कादायक असल्याचे मानले जाते. दुसरीकडे २०१४ मध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींना अमेठीमध्ये कडवी लढत दिली होती. त्यांनी राहुल गांधींचे विजयाचे मताधिक्क्य मोठया प्रमाणात कमी केले होते. पराभवानंतरही त्यांनी अमेठी सोडली नाही. मागची पाच वर्ष त्या अमेठीमध्ये त्या सक्रीय होत्या. तिथल्या मतदारांच्या संपर्कात होत्या. २००९ मध्ये राहुल गांधी अमेठीमधून २ लाख ७० हजार मतांनी जिंकले होते. २०१४ मध्ये हेच त्यांचे विजयाचे मताधिक्क्य फक्त १ लाख राहिले होते आणि यंदा त्यांना परभावाची चव चाखावी लागली.

 

देशाला मिळाले स्थिर सरकार

 

पुन्हा एकदा देशाला स्थिर सरकार मिळाले, हे कोट्यावधी भारतीयांचे भाग्यच! हा राष्ट्रीय शक्तींचा विजय आहे. लोकशाहीच्या या विजययात्रेत ज्यांचे योगदान राहिले, त्यांचे अभिनंदन. आम्हाला विश्वास वाटतो की, नवीन सरकार जनसमान्यांच्या भाव-भावनांबरोरच इच्छा आकांक्षांनाही पूर्ण करण्यात यशस्वी होईल. निवडणुक प्रक्रिया समाप्त झाल्याने आता परपस्परांतली कटुताही समाप्त व्हावी.

 

- भय्याजी जोशी

सरकार्यवाह, रा. स्व. संघ

 

मोदींना विजयाच्या शुभेच्छा

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या पराभवानंतर पत्रकार परिषद घेत निकालाची जबाबदारी घेतली. ते म्हणाले की, आमची लढाई विचारधारेशी आणि मी नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला विजयाच्या शुभेच्छा देतो. सोबतच राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना धीर धरण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले की, आमचे जे नेते पराभूत झाले, त्यांनी घाबरण्याची गरज नाही आणि विश्वासापासून न ढळण्याचे आवाहन केले. राहुल गांधींनी स्मृती इराणींचा विजय स्वीकारत अमेठीतील जनतेशी प्रेमाने वागण्याचे आवाहन केले. दुसरीकडे राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामादेखील संपुआच्या प्रमुख व मातोश्री सोनिया गांधींपुढे ठेवल्याचे समजते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat