दिंडोरी लोकसभा मतदारसंघ : पवारांनी कायम ठेवली कमळाची परंपरा

    दिनांक  23-May-2019   


 


सलग तीन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आणि सध्या विद्यमान खासदार असलेले हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधून नव्याने पक्षात दाखल झालेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने दिंडोरी मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. या मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले, माकपचे जीवा पांडू गावित, वंचित बहुजनचे बापू बर्डे यांच्यात थेट लढत होती. मूलतः वनवासीबहुल असणारा हा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो. २००५ ते २०१४ या तीनही लोकसभा निवडणुकांत येथे भाजपचे प्राबल्य दिसून आले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख, ४२ हजार,७८४ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत डॉ. भारती पवार यांच्या विजयाने भाजपच्या विजयाची परंपरा डॉ. भारती पवार यांनी कायम ठेवली आहे.

 

नाशिकप्रमाणेच दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथील सभा महत्त्वपूर्ण ठरली, असेच या निकालावरून दिसून येते. या सभेमुळे या मतदार संघात डॉ. भारती पवार यांच्या विजयाची दिशा निश्चित झाली, असे म्हणण्यास हरकत नसावी. दिंडोरी लोकसभा मतदार संघातून डॉ. भारती पवार यांचा जवळपास दोन लाखांइतक्या मतांनी झालेला विजय आणि महाले हे क्रमांक दोन आणि गावित हे क्रमांक तीनवर असणे, हे दिंडोरी लोकसभा मतदार संघात आधी असणारी भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या निकालांच्या आडून आगामी विधानसभा निवडणुकांकडे पाहिल्यास विधानसभेत दिंडोरीमधूनदेखील युतीचे पारडे जड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१४ च्या निवडणुकीत तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या डॉ. भारती पवार यांना यांना २ लाख, ९५ हजार, १६५ मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा डॉ. भारती पवार यांना प्राप्त झालेले मताधिक्क्य दिंडोरीमध्ये कमळासाठी अनुकूल वातावरण असल्याचेच द्योतक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat