केंद्रीय मंत्र्यांचा मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

    दिनांक  23-May-2019नवी दिल्ली : रालोआला ऐतिहासिक विजयाच्या पथावर नेल्याबद्दल भाजप आणि रालोआतील बहुतेक सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. वरिष्ठ केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, रामविलास पासवान यांच्यासह अनेक मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनाच या भव्य विजयाचे श्रेय दिले आहे. या निवडणुकीत सर्वत्र मोदी यांची त्सुनामीच दिसून आली आणि यासाठी मी मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे ट्विट लोकजनशक्तीचे नेते रामविलास पासवान यांनी केले.

 

सुरेश प्रभू यांनीही, या निवडणुकीत मला फक्त मोदी त्सुनामीच पाहायला मिळाली. या त्सुनामीत विरोधक दूरवर वाहून गेले. हा प्रकार म्हणजे राजकीय त्सुनामीसारखाच आहे. दरड कोसळून जशी घरे उद्ध्वस्त होतात, तसाच काहीसा हा प्रकार आहे. या मोदीरूपी दरडीखाली विरोधक असे काही दबल्या गेले की, ते नजीकच्या भविष्यात बाहेर येणे कठीणच दिसते, ईस्ट असो वा वेस्ट, भाजपच बेस्ट आणि हीच सत्यता आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देश आता आणखी वेगाने विकास होणार आहे, असा विश्वास प्रभू यांनी ट्विटरवर व्यक्त केला.

 

भाजपच्या विजयासाठी मी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करते आणि सोबतच, मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याबद्दल मतदानांचेही अभिनंदन करून, त्यांचे आभार मानते. जनतेचे आपले आशीर्वाद भाजप आणि रालोआला दिले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचेही या विजयात फार मोठे योगदान आहे. मोदी यांच्या विकासदृष्टीचा संदेश देशाच्या कानाकोपर्यात पोहोचविला, असे स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती आदी नेत्यांनीही मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

नकारात्मक राजकारणाचा पराभव : सहस्रबुद्धे

 

मोदी यांच्या सकारात्मक विचारधारेच्या प्रवाहात विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला. ही नकारात्मक विचारधारा या प्रवाहात वाहून गेली, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.

 

विकास कामांचा हा विजय : शाहनवाज हुसेन

 

मोदी यांनी मागील पाच वर्षांमध्ये जो विकास केला, त्याचाच हा विजय आहे. रालोआची ही आजवरची सर्वाधिक चांगली कामगिरी ठरली आहे. जातीचे राजकारण करून, काही पक्ष आघाड्या स्थापन करण्याच्या प्रयत्नात होते, पण मोदी यांच्या लाटेमुळे त्यांनाही झटका बसला आहे, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.

 

जगभरच्या राष्ट्रप्रमुखांनी दिल्या मोदींना शुभेच्छा

 

लोकसभा निवडणुकीतील धडाकेबाज यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदींचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक, जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी, आणि जर्मनीचे भारतातील राजदूत यांनी नरेंद्र मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही यावेळी सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat