नाशिकमध्ये घडला इतिहास, तर दिंडोरी मध्ये कमळ राहिले फुललेले

    दिनांक  23-May-2019
नाशिक : १७ व्या लोकसभेचे निकाल घोषित झाले आहेत. विविध वाहिन्यांवर दाखविण्यात आलेल्या एक्झिट पोल मधील अंदाजानुसार आणि अपेक्षेप्रमाणे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप – शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले. नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. तर, दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भाजप च्या उमेदवार डॉ. भारती पवार या एक लाखां पेक्षा जास्तमतांचे मताधिक्य प्राप्त करून विजयारूढ झाल्या.

 

येथील अंबड वेअर हाउस येथे सकाळी साधारणतः ८ वाजेच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ झाला. यापूर्वी सकाळी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत सील करण्यात आलेले एव्हिएम मशीन उघडण्यात आले. यावेळी मतमोजणीच्या चार फेर्यानखेर गोडसे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. सोळाव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख ७०० मतांचे मताधिक्य प्राप्त केले होते. या फेरी अखेर भुजबळ यांच्या पारड्यात १लाख ९४ हजार ७२० मते पडली होती.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार होते. यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले होते. तर, दिंडोरी लोकसभा मतदार संघात देखील नाशिकपेक्षा वेगळे चित्र दिसून आले नाही. येथे दुस-या फेरीनंतर भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली होती. तिसऱ्या फेरी अखेर डॉ. पवार यांनी २४,७८३ मते प्राप्त केली होती. तर त्याच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आणि डॉ. पवार यांचे प्रतिस्पर्धी धनराज महाले यांच्या पारड्यात नांदगाव , कळवण येथील मतमोजणीची १५६१९ मते पडली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र तिसऱ्या फेरीत पवार यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले.


दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार होते. तसेच, नाशिकपेक्षा दिंडोरी मतदार संघात यंदा जास्त म्हणजे ६५ टक्के इतके मतदान झाले होते. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानानात्र नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी टपाली मतमोजानिपासूनच विजयी आघाडी कायम ठेवली होती. मतमोजणी ला सुरुवात झाल्यावर अतिशय उत्कंठा लागून राहिली होती. परंतु गोडसे यांनी आघाडी कायम राहिली त्यांनी सातत्याने आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, वंचित आघाडीचे पवन पवार, अपक्ष माणिकराव कोकाटे यांना शह देत सातत्याने विजयी परंपरा कायम ठेवली. आणि चौथ्या फेरीत तर, सरळ गोडसे यांनी तब्बल सात हजार मतांचा लीड घेऊन आपली सुरु असलेली आठ हजारची आघाडी दुप्पट करत सर्व प्रतिस्पर्ध्यांवर १५ हजार मतांनी आघाडी घेतली.

 

भोजन अवकाशानंतर सुरु झालेल्या पाचव्या फेरीत समीर भुजबळ यांनी २००० मतांची आघाडी कमी करण्यात यश मिळविले होते. तर, याच फेरीत सिन्नर विधानसभा मतदार संघातील मतमोजणीत अपक्ष माणिक कोकाटे यांनी २२००० मते घेत आपले आणि गोडसे यांच्यातील अंतर केले. यावेळी पुन्हा काही बदल होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु ६ व्या फेरीत पुन्हा गोडसे यांनी नाशिक पूर्व आणि पश्चिम या दोन मतदार संघात निर्णायक अशी ११००० ची आघाडी घेतली आणि याच ठिकाणी आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर ३७००० पेक्षा अधिक मतांचा लीड दिला. या दुपारच्या यशस्वी आघाडीनंतर गोडसे सातत्याने पुढे गेले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोजण्यात आलेल्या ११ व्या फेरी अखेर २ लाख ५९ हजार ३०९ तर, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना १ लाख ४९ हजार ९०३, अपक्ष माणिक कोकाटे यांना ६१, ९५३, पवन पवार यांना ४३ हजार ४२१ मते मिळाली.


दिंडोरी लोकसभा मतदार संघात दुसऱ्या फेरी नंतर धनराज महाले हे पुन्हा आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर पकड ठेवण्यात अपयशी ठरले. सातत्याने तिसर्या फेरी पासून भाजपच्या डॉ. पवार या आघाडी घेत राहिल्या. तिसर्या फेरीत त्यांना नांदगाव आणि निफाड मधून मोठी आघाडी मिळाली त्यामुळे त्यांनी आपले सर्व जवळचे विरोधक यांच्यावर १२ हजार मतांपेक्षा जास्त आघाडी घेतली आणि हीच भाजपच्या डॉ. पवार यांना निर्णायक आघाडी मिळाली. या फेरी नंतर अवकाश होऊन पुन्हा सुरु झालेल्या मतमोजणीत डॉ. पवार यांनी आपली आघाडी कायम ठेवली.

भाजपच्या डॉ. भारती पवार यांना सुरगाणा व कळवण मधून मिळालेली १२, ३०० मतांची आघाडी महत्वपूर्ण ठरली. आणि इथून डॉ. भारती पवार सातत्याने विजयाकडे वाटचाल करू लागल्या. सायंकाळी ५ वाजता संपलेल्या १७ व्या फेरी अखेर भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यावर १ लाख ५३ हजार ४४५ मतांनी आघाडी घेत विजयावर शिक्कमोर्तब केला. दरम्यान १६ व्या फेरीमध्ये हेमंत गोडसे यांनी ३ लाख ८९ हजार ८५३ मते प्राप्त केली तर, समीर भुजबळ यांनी २ लाख ४९ हजार ७७ मते प्राप्त केली. पवन पवार यांना ७१,८२४ ,माणिकराव कोकाटे यांना एक लाख २७ हजार ३७ मते मिळाली होती. अंबड येथील मतमोजणी केंद्रावर भाजपचे लक्षमण सावजी, विजय साने, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, देवदत्त जोशी तर शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, आमदार योगेश घोलप, शिवसेना उपनेते बबन घोलप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


भाजप ने केला विजयाचा जल्लोष

देशात, राज्यात आणि नाशिक व दिंडोरी मतदारसंघात भाजप- शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. येथील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालायात व शिवसेना कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकत्र येत फटाके फोडत व पेढे वाटत आनंद साजरा केला.

नाशिकमध्ये घडला इतिहास

नाशिकमध्ये एकदा निवडून आलेला खासदारकीचा उमेदवार पुन्हा निवडून येत नाही असा समाज आजवर रूढ झालेला होता. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीमुळे यंदा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. नाशिकच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर, १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सलग दोन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भानुदास कवडे खासदार झाले. त्यावेळी नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर भाऊराव गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती. कवडे यांनी त्यांचा ३६ हजार ३०७ मतांनी पराभव केला होता.

 

कवडे यांना १ लाख ५५ हजार ६३२ मते म्हणजेच ५६.६० टक्के मते मिळाली होती. त्यानंतर १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत कवडे यांनी भारतीय क्रांती दलाचे धैर्यशीलराव पवार यांचा तब्बल १ लाख ४५ हजार ७४१ मतांनी पराभव केला होता. कवडे यांना २ लाख ८ हजार ८९८ मते मिळाली. म्हणजेच ७४.१५ टक्के मते भानुदास कवडे यांना मिळाली होती. धैर्यशील पवार यांना अवघे ६३ हजार १५६ म्हणजे २२.४२ टक्के मते मिळाली होती. सलग दोन वेळा खासदारकीची माळ गळ्यात पडण्याचा भानुदास कवडे यांचा विक्रम आजवर कोणीही मोडलेला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे निवडून आल्याने त्यांनी कवडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असल्याने नाशिकमध्ये खूप वर्षांनी इतिहास घडला.

 

समीर भुजबळ यांनी गमाविली संधी

सलग दोन वेळा निवडून येण्याचा मान कवडे यांना यापूर्वी प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे एका निवडणुकीचे अंतर ठेवून दोनदा खासदारकी मिळवणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गो.ह. देशपांडे यांच्या स्मृती समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे जागृत झाल्या होत्या. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे १९५१ मध्ये नाशिकचे पहिले खासदार म्हणून गो.ह. देशपांडे यांना मान मिळाला होता. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत समाजवादी पक्षाचे नारायणराव झोडगे यांचा ३५ हजार ६६१ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शेड्युुल कास्ट फेडरेशनचे भाऊराव गायकवाड यांनी गोविंदरावांचा ११ हजार ३६९ मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा गो.ह. देशपांडे यांनी १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काढला होता. यावेळी त्यांनी भाऊराव गायकवाड यांचा तब्बल ५९ हजार ६५४ मतांनी पराभव केला होता. देशपांडे यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी समीर भुजबळांना या निवडणुकीच्या निमिताने प्राप्त झाली होती. मात्र, मतदारांनी भुजबळांकडून ती संधी हिरावून घेतल्याचे निकालावरून दिसून आले.

 
 

निकालासाठी समाज माध्यमांवर खिळल्या नजरा

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तरुणाईमध्ये निवडणूक निकालाविषयी उत्सूकता दिसून आली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून समाजमाध्यमांवर वेगवेगळे अंदाज व्यक्त होत होते.फेरी गणिक फिरणारी आकडेवारी पहात धीर धरण्याचे आवाहन करण्यात येत होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat