‘फडणविशी’ आणखी मजबूत...

    दिनांक  23-May-2019   लोकसभेच्या महाराष्ट्रातील निकालांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला बळ दिलंच परंतु महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकहाती नेतृत्वावरही शिक्कामोर्तब केलं आहे. आता अवघ्या चार-पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीच्या दृष्टीनेही महाराष्ट्रातील हे निकाल महत्वाचे ठरणार आहेत.


महाराष्ट्रात एकूण ४८ मतदारसंघांपैकी भाजप-शिवसेना युतीने ४१ तर एकट्या भाजपने २३ जागांवर विजय नोंदवला. यंदा युतीच्या जागावाटपानुसार २५ जागा भाजप लढवत होता. त्यामुळे राज्यात भाजपने ९२ टक्के यश संपादन केलं. या सर्व रणधुमाळीत भाजपच्या राज्यातील नेतृत्वाची कमान देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली. गेले दोन-तीन महिने फडणवीस यांनी केलेली अविश्रांत व अथक मेहनत पाहता सर्वसामान्य लोकांना आकर्षित करणारा नेता आणि कुशल राजकीय व्यवस्थापक अशा दोन्ही बाबतींत फडणवीस यांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे असं म्हणता येईल. प्रचारसभा, दौरे, बैठका, भाषणं यांच्या धडक्यासह दुसऱ्या बाजूला विविध राजकीय व्यूहरचना रचून त्या यशस्वी करत फडणवीस यांनी राज्यात भाजपचा मार्ग सुकर केला. शिवसेनेशी केलेली युती हे फडणवीस यांच्यातील राजकीय व्यवस्थापकाचं एक मोठं यश म्हणावं लागेल. भाजप-शिवसेनेचं गेल्या पाच वर्षांतील नातं ज्यांना ठाऊक आहे, त्यांना या यशाचं महत्व समजू शकेल. अनेकदा जाहीरपणे शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दुसरीकडे शिवसेनेशी असलेले संबंध फार ताणले जाणार नाहीत, याचीही काळजी घेतली. शिवसेनेला अर्थातच युतीची गरज होतीच. जागावाटपात शिवसेनेला एक वाढीव जागा देऊन सेनेचं समाधान करणं आणि त्या जागेवर सेनेचा उमेदवार म्हणून तेथील भाजपचाच विद्यमान खासदार देऊन फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आणि तो यशस्वीही झाला. भाजप-शिवसेना युती झाल्याचा फायदा काय झाला, तो आज आपल्यासमोर आहेच.

 

राज्याच्या राजकारणात गेली पाच दशके महत्वाचं स्थान असलेले, धूर्त व मुरब्बी नेते अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शांतपणे केलेली कोंडी, हे फडणवीस यांचं आणखी एक यश म्हणावं लागेल. संसदेत कुणालाच बहुमत न मिळाल्यास महाराष्ट्रातील आपल्या १०-१५ खासदारांच्या जोरावर इतर पक्षांची मोट बांधून पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करणं, हा शरद पवार यांचा गेल्या १५ वर्षांतील आवडता (आणि अयशस्वी) प्रयत्न. याही वेळी स्वतः लोकसभा लढवण्याचे संकेत देऊन पवारांनी आपली पुढची दिशा स्पष्ट केली होतीच. परंतु, फडणवीस यांच्या डावपेचांमुळे राष्ट्रवादीसाठी महत्वाच्या असलेल्या तीन-चार मतदारसंघांत पवारांना अडकून राहावं लागलं. शिवाय, माढ्यातून निवडून येण्याची शाश्वती नसल्यामुळे पवारांना स्वतःलाही रिंगणात उतरण्यापूर्वीच माघार घ्यावी लागली. भले त्यांनी पार्थ पवार यांच्या मावळ येथील उमेदवारीचं कारण देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही दिवसांतच अकलूजचं मोहिते-पाटील घराणं भाजपच्या गोटात दाखल झालं आणि पवारांनी माढ्यातून का माघार घेतली, हे स्पष्ट झालं. पुढे रणजीतसिंह निंबाळकरांच्या भाजपप्रवेशामुळे तर यावर शिक्कामोर्तबच झालं. पार्थ पवारांच्या उमेदवारीवरून घेतलेल्या पवारांनी कोलांट्याउड्यांमुळे पवार कुटुंबात, विशेषतः शरद पवार व अजित पवार यांच्यात सारं काही आलबेल नाही, हेही नव्याने दिसून आलं. या सर्व कोंडीमुळे शरद पवार पुरते हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. इव्हीएमबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिका हीच हतबलता दर्शवणाऱ्या होत्या.

 

या सगळ्याचा परिणाम, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात पुन्हा एकदा अवघ्या ४ जागांपुरती मर्यादित राहण्यात झाला. दुसरीकडे, माढा या एकेकाळी स्वतः शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला. शिवाय, मावळमध्येही खुद्द शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. राष्ट्रवादीला हे धक्के देत असताना, दुसरीकडे काँग्रेसलाही विखे-पाटील यांच्या रूपाने फडणवीस यांनी मोठा धक्का दिला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या मुलाला म्हणजेच सुजय विखे यांना भाजपमध्ये आणून उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीने अहमदनगरच्या जागेवरून काँग्रेसशी तडजोड करण्यास नकार दिला आणि त्यातच शरद पवारांनी राधाकृष्ण विखेंना बाळासाहेब विखेंच्या पराभवाची आठवण करून देत नाहक दुखावलं. यातून आघाडीत वादाची ठिणगी पडली आणि भाजपनेही ही संधी योग्यवेळी साधली. सुजय यांच्या भाजप उमेदवारीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील बेबनाव वाढलाच शिवाय काँग्रेस अंतर्गत असलेली गटबाजीही उघड झाली. याची परिणती म्हणून, काँग्रेसचा विरोधी पक्षनेता नगर आणि शिर्डीत युतीच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार करताना दिसला.

 

अशारितीने देवेंद्र फडणवीस व भाजपने शांतपणे व मोठ्या हुशारीने खेळलेल्या डावपेचांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आघाडीतील तसेच पक्षांतर्गत वादांत अधिकच गुरफटत गेले. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर झाला, एकूण प्रचारावर झाला. या सगळ्यातून अखेर निकाल काय आले, हे आपल्या समोर आहेतच. या कुशल राजकीय व्यवस्थापनासोबतच फडणवीस यांनी पायाला भिंगरी लावून राज्यभर घेतलेल्या प्रचारसभा, रोड शो, बैठका इ. देखील आपण पाहिलं आहेच. यातून राज्यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवत लोकसभेतील सत्तासंपादनात महत्वाची भूमिका उचलली आहे. शिवाय, राज्यातील राजकारणाच्या नाड्या कुणाच्या हाती आहेत, हेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं नेतृत्व गेल्या पाच वर्षांत सिद्ध केलं आहेच. परंतु, लोकसभेच्या या निकालांमुळे राज्यातील ही ‘फडणविशी’ अधिकच मजबूत झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल फडणवीस यांच्या पथ्थ्यावर पडतील, अशीच चिन्हं आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat