तामिळनाडूतून पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

    दिनांक  22-May-2019


 

 
 पालीचे नामकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या नावे 

मुंबई (अक्षय मांडवकर) : महाराष्ट्रातील तीन तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी तामिळनाडूमधून पालींच्या दोन नव्या प्रजातींचा उलगडा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि संशोधक तेजस ठाकरे यांच्या नावाने एका प्रजातीचे नाव 'निम्यास्पीस ठाकरेइ' आणि दुसऱ्या पालीचे नामकरण 'निम्यास्पीस शेवरोयऐंसीस' असे करण्यात आले आहे. तर 'निम्यास्पीस येरकाडेनसीस' या प्रजातीची इथ्यंभूत शास्त्रीय माहिती शास्त्रज्ञांनी प्रकाशित केली आहे.

 
 

भारतातील पालींच्या प्रजातींमध्ये दोन नव्या प्रजातींची भर पडली आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या वर्गाबाबत संशोधनाचे काम सुरू आहे. याच कामाअंतर्गत तामिळनाडू येथील 'शेवरोय' डोंगराळ भागातील यरकाड या गावातून पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. बंगळूरु येथील 'नॅशनल सेन्टर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स' या संस्थेत कार्यरत असणारे अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि निखिल गायतोंडे या तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी या पालींचा उलगडा केला आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रजाती 'निम्यास्पीस' या पोटजातीमधील आहेत. पालींच्या या पोटजातीमध्ये भारतात सुमारे ३६ प्रजातींचा आढळतात.

 
 

 गेल्या वर्षभरापासून या पालींवर आम्ही शोधकार्य करत असल्याची माहिती शास्त्रज्ञ अक्षय खांडेकर यांनी दिली. तरुण संशोधक तेजस ठाकरे यांनी यातील एका प्रजातीच्या पालीला प्रथम पाहिल्याने आणि या संशोधन कार्यात आम्हाला मदत केल्याने त्या पालीचे नामकरण त्यांच्या नावे 'निम्यास्पीस ठाकरेइ' असे केल्याचे खांडेकर यांनी सांगितले. तर दुसऱ्या पालीचे नामकरण ती 'शेवरोय' या डोंगराळ भागात आढळत असल्याने त्यानुसार 'निम्यास्पीस शेवरोयऐंसीस' ठेवल्याचे, खांडेकर म्हणाले. तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र आहेत. तेजस स्वत: उभयसृपशास्त्र संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या नावावर गोड्या पाण्यातील काही खेकड्यांच्या नव्या प्रजातींची नोंद आहे.

 
 

शास्त्रज्ञांनी पालींच्या नव्या प्रजातींची चाचणी गुणसुत्र (डीएनए) आणि आकारशास्त्राच्या (मोर्फोलाॅजी) आधारे केली. या प्रजाती प्रामुख्याने खडकाळ अधिवासात आढळतात. 'निम्यास्पीस ठाकरेइ' ही प्रजात ४१ मि.मि आणि 'निम्यास्पीस शेवरोयऐंसीस' ही पाल ३५ मि.मि पर्यंत वाढते. या दोन्ही प्रजातींमधील नर भडक रंगाचे तर माद्या मातकट रंगाच्या असतात. किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. या दोन पालींबरोबरीनेच संशोधकांनी 'निम्यास्पीस येरकाडेनसीस' या प्रजातीविषयी इंथ्यभूत माहिती प्रकाशित केली आहे. या प्रजातीचा शोध २००० साली लागला होता. मात्र त्याविषयी सखोल शास्त्रीय माहिती उपलब्ध नव्हती. आता संशोधकांनी या प्रजातीचा अधिवास, आहार यांविषयीची इंथ्यभूत माहिती प्रकाशित केली आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat