सामान्यांचे चित्रपटगृह राहिले फक्त ६५...

    दिनांक  22-May-2019मुंबई : मुंबईतील सामान्यांचे चित्रपटगृह म्हणजेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृह. सुरुवातीला मुंबईची ओळख असलेल्या या सीगल स्क्रीन चित्रपट गृहांची संख्या आता नामशेष होत चालीय. वाढते मॉल्स आणि मल्टिप्लेक्स यामुळे सिंगल स्क्रीनकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी दादरची शान मानल्या जाणाऱ्या 'चित्रा' थिएटर नुकतेच बंद करण्यात आले. यामुळे सिंगल स्क्रीन थिएटरच्या आकडेवारीत आणखी एक नाव कमी झाले आहे. मुंबईत सुमारे ६५ सिंगल स्क्रीन्स उरले असून, येत्या काळात ही संख्या आणखी कमी होईल अशी भीती चित्रपट रसिकांकडून व्यक्त होत आहे.

 

सामान्यांच्या खिश्याला परवडेल असे भाव असणाऱ्या सिंगल स्क्रीन थिएटरांना मल्टिप्लेक्स आल्यानंतर उतरती कळा लागली. प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर अशा थिएटर्सचे उत्पन्न घातले आणि सिंगल स्क्रीनचा पडदा उतरत गेला. मल्टिप्लेक्सशी असलेली स्पर्धा, सिनेमांची पायरसी आणि आता डिजिटल माध्यमांचं आव्हान यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. २-३ वर्षांपूर्वी मुंबईतल्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची संख्या १३०च्या घरात होती. राज्यातही थिएटर्सची संख्याही कमी होत आहे. २००० सालापूर्वी राज्यभरात १,२०० थिएटर्स होती. ती आता ४६५ थिएटर्स उरली आहेत, अशी माहिती 'सिंगल स्क्रीन थिएटर्स ओनर्स असोसिएशन'ने दिली आहे.

 

'सिंगल स्क्रीन थिएटर्स ओनर्स असोसिएशन'चे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितले की, "एखादा चित्रपट हिट ठरला तर नफा केवळ सर्व्हिस प्रोव्हायडर आणि वितरकाला होतो. सिंगल थिएटर्सना नफा मिळतच नाही. एका खेळाला हजारामागे केवळ शंभर प्रेक्षक येतात. त्यामुळे खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे असा प्रश्न थिएटर मालकांना पडतो. त्यामुळेच मुंबईसह राज्यभरातली अनेक थिएटर्स डबघाईला आली आहेत."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat