मोदीपर्वावर होणार शिक्कामोर्तब !

    दिनांक  22-May-2019देशभरात भाजपची आघाडी 


नवी दिल्ली : सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिलपासून सुरू झालेल्या रणधुमाळीचा-लोकशाहीच्या महोत्सवाचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असून गुरुवार मतमोजणीचा दिवस आहे. जवळपास सव्वा महिनाभर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्ष मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत होते.

 भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या काळात प्रचाराची कमान सांभाळली तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून राहुल गांधी, समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाकडून मायावती, तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी, तेलुगू देसमकडून चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आदी नेत्यांनी आपापल्या पक्षाचा प्रचार केला. देशभरातील सर्वच नेत्यांनी केलेल्या प्रचाराचे, आवाहनाचे नेमके फलित काय, मतदारराजाने नेमके कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, देशात आता कोण सत्तेवर येणार, याचा उलगडा आज होईल.
 

देशातल्या निरनिराळ्या माध्यमसंस्थांनी घेतलेल्या एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सत्तेत येईल, असे भाकीत रविवारी वर्तवले. परिणामी भाजपच्या गोटात आनंदाला उधाण आले असून बहुतेक उमेदवारांनी विजयी जल्लोषाचीदेखील तयारी केली आहे. भाजप आघाडीला देशात ५४२ पैकी किमान २६७ ते कमाल ३३६ इतक्या जागा मिळतील, असे अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केल्याने आज सकाळपासून नवी दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणच्या भाजप कार्यालयाबाहेर मिठाई, लाडूवाटपाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. दुसरीकडे काँग्रेस आघाडीच्या बाजूने मात्र निराशेचे वातावरण असले तरी एक्झिट पोल्सवर विश्वास ठेवू नका, इथपासून ते ऑस्ट्रेलियातील एक्झिट पोल खोटे ठरल्याचे दाखले देत ते स्वतःला आणि कार्यकर्त्यांनाही धीर देताना दिसत आहेत. सोबतच एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे अवसान गळालेल्या विरोधकांनी इव्हीएमच्या नावाने रडारडीला सुरुवात केल्याचेही गेल्या तीन-चार दिवसांत पाहायला मिळाले. आता आज निकालाच्या दिवशी ही मंडळी नेमके काय रतात, कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

चार हजारांपेक्षा अधिक मतमोजणी केंद्रे

 

निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेऊन यंदाची निवडणूक-मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ३८ दिवसांपर्यंत चाललेल्या मतदान प्रक्रियेत यंदा २२ लाख, ३० हजार बॅलेट युनिट, १० लाख, ६३ हजार कंट्रोल युनिट आणि १० लाख, ७३ हजार व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. देशातील ५४२ लोकसभा मतदारसंघांत १० लाख, ३५ हजार मतदान केंद्रांवर १२ लाखांपेक्षा अधिक इव्हीएममध्ये मतदारांनी आपले मत आणि उमेदवारांचे भवितव्य बंद केले. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी एक वा दोन ठिकाणी स्ट्राँगरूम तयार करण्यात आल्या असून चार हजारपेक्षा अधिक मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी करण्यात येणार आहे. सर्वच स्ट्राँगरूमच्या चारही बाजूंनी सुरक्षा कर्मचार्यांनी पहारा दिला असून आत व बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.

 

मतमोजणीला दि. २३ मेला म्हणजेच गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली तरी प्रारंभी पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात येईल. यासाठी चार टेबल तयार केले असून यावेळी राजकीय पक्ष वा उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. कितीतरी लोकसभा मतदारसंघात ३० ते ४५ हजार इतकी पोस्टल मते असून त्यांची मोजणी झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरेबल पोस्टल बॅलेट म्हणजेच ईटीपीबीएस मतांची मोजणी होते. या सर्व प्रक्रियेला किमान दोन तासांचा अवधी लागू शकतो. ही मोजणी झाल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे १० ते १०.३० च्या दरम्यान इव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होते.

 

सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे निवडणूक आयोग यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच इव्हीएम बाजूला काढून ठेवणार असून सर्वात शेवटी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मतपावत्यांची पडताळणी केली जाते. इव्हीएम व व्हीव्हीपॅट मतपावत्यांच्या पडताळणीला किमान एक तास लागतो. म्हणजेच पाच इव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीला सरासरी पाच तास लागू शकतात. कारण एकावेळी एकाच इव्हीएम व व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याचा नियम असून एकाचवेळी सर्वच पाचही मशीनची पडताळणी करता येत नाही.

 

रात्री ११ पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मतमोजणी व निकालामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वर उल्लेखलेल्या इव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीमुळे किमान पाच तासांचा उशीर होऊ शकतो. दुसरीकडे मतमोजणी विधानसभा मतदारसंघातील लोकसंख्या आणि क्षेत्रानुसार विविध फेर्‍यांत होते. किमान १० ते १२ फेर्‍यांमध्ये मतमोजणी होते आणि प्रत्येक फेरीच्या मोजणीला अर्धा ते पाऊण तास लागू शकतो, म्हणजे एका विधानसभा मतदारसंघातील मोजणीसाठी सहा ते आठ तास लागू शकतात. या सहा ते आठ तासांत इव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीचे पाच तास मिळवले तर रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होऊ शकते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat