‘वनमाला‘ एक तेजस्वी अभिनेत्री

    दिनांक  22-May-2019


दि. २३ मे ही प्रसिद्ध अभिनेत्री वनमाला यांची जयंती. सुशीलादेवी पवार उर्फ ‘वनमाला’ यांच्या चित्रपट क्षेत्रातील जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...

 

दि. २३ मे, १९१५ रोजी सुशीलादेवी पवार उर्फ वनमाला यांचा जन्म झाला. १९३०च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी पुणे येथे कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्या वेळी देविका रानी आणि दुर्गा खोटे यांच्यासारख्या महिलांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली असली तरी, खानदानी कुटुंबांतील महिलांना चित्रपटांमध्ये काम करण्यास परवानगी नव्हती. व्ही. शांताराम यांनी वनमाला यांना चित्रपटात अभिनय करण्यासाठी प्रोत्साहित केले. हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटांमध्ये वनमाला लोकप्रिय ठरल्या. पण, त्यांचा हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नक्कीच नव्हता. ग्वाल्हेरच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या वनमालांच्या चित्रपटांवर म्हणूनच त्यांच्याच नगरात बंदी घालण्यात आली.

‘वनमाला’ हे नाव जे आजही ‘श्यामची आई,’ ‘सिकंदर’ यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. ‘वनमाला’ या मूळच्या सुशीलादेवी पवार. अतिशय हुशार, सुशिक्षित आणि उत्तम अभिनय कौशल्याने परिपूर्ण अशा अभिनेत्री. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वनमाला यांनी पृथ्वीराज कपूरच्या ‘विरुद्ध सिकंदर’ (१९४१) या चित्रपटातही भूमिका साकारली होती. व्ही. शांताराम यांच्या आग्रहामुळे ‘लपंडाव’ या पहिल्या हिंदी, मराठी अशा द्विभाषीय चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. सोहराब मोदींची निर्मिती आणि रामचंद्र ठाकूर दिग्दर्शित ‘सिकंदर‘ (१९४१) व ‘शरबत्ती आँखे‘ (१९४५) या चित्रपटांमुळे त्या प्रसिद्धझोतात आल्या. ‘सिकंदर’चित्रपटातील त्यांनी अभिनित केलेल्या‘रुकसाना’च्या भूमिकेची स्तुती करावी तेवढी कमीच!

 

वनमालांचे डोळे हे अतिशय सुंदर आणि तेजस्वी होते. म्हणूनच ‘शरबत्ती आँखे‘ या चित्रपटात त्यांच्या डोळ्यांचा एक कटाक्षही प्रेक्षकांना श्वास रोखायला लावायचा. या चित्रपटांबरोबरच ‘प्यार करनाही पडेगा,’ ‘बहुत मुख्तसार है हमारी कहानी‘ या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. तसेच ‘पर्बत पे अपना डेरा‘ या चित्रपटात त्यांनी आंधळ्या मुलीची भूमिका उत्कृष्टपणे सादर केली. ‘चरणोंकी दासीया चित्रपटामधील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला.

वनमाला यांच्या आयुष्यातील अतिशय गाजलेल्या आणि नावाजलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी एका मराठी स्त्रीने पारंपरिक ब्राह्मण स्त्रीची वठवलेली भूमिका ही एक आश्चर्याची गोष्ट ठरली. कारण, वनमालांच्या कसदार अभिनयाची झलक आजही ‘श्यामची आई’ चित्रपट पाहताना मनाला स्पर्श करुन जाते. साने गुरुजींच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला मराठी क्षेत्रातील मैलाचा दगड म्हटले जाते. अभिनेते माधव वझे, ज्यांनी ‘श्यामच्या आई’मधील ‘श्याम’ची भूमिका निभावली होती, ते म्हणतात, “अतिशय सहज व संस्कारित स्त्री म्हणून वनमला यांची ओळख होती.”

 

वनमाला यांचे खाजगी आयुष्य कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांचे प्रथम पती पी. के. सावंत यांच्याशी संबंध फिस्कटल्यानंतर वनमाला यांची आचार्य अत्रेंशी जवळीक निर्माण झाली. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात “मी कुणाची पत्नी होऊ शकले नाही,” अशी बोचरी खंत त्यांनी बोलून दाखविली होती. वनमालाबाईंच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचे सान्निध्य लाभलेले निकटवर्तीय प्रा. प्रफुल्लचंद तावडे म्हणतात की, “वनमाला ‘पाकिजा’ हा चित्रपट दिवसातून तीन-तीन वेळा पाहत असे. त्यांची मैत्रीण नर्गिसच्या अनेक अनेक आठवणी त्या मला नेहमी सांगत.”

आज वनमाला यांच्या एकूण ४० चित्रपटांपैकी फक्त ४ चित्रपटांच्या रिळ अस्तित्वात आहेत. त्यांच्यासारख्या नामवंत कलाकाराच्या कारकिर्दीला अशोभनीय अशी ही बाब म्हणावी लागेल. चित्रपटक्षेत्रात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत असल्याने काळाच्या पडद्याआड गेलेल्या किंवा वृद्धावस्थेत असणार्‍या कलाकारांकडे चित्रपट क्षेत्राचे किती लक्ष असते, हे सांगणे कठीणच!

 

वनमालाबाई जाता-जाता समाजासाठी खूप काही करून गेल्या. त्या छत्रपती शिवाजी मेमोरियल संस्थेच्या सभासद होत्या. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मथुरा येथे त्यांनी ‘हरिदास कला संस्था’ सुरू केली. वनमाला यांचे कर्करोगाने २९ मे, २००७ रोजी ग्वाल्हेर येथे निधन झाले. त्या आज जरी आपल्यात नसल्या तरी, त्यांचे दर्जेदार चित्रपट आणि अभिनय यामुळे त्या सदैव आपल्या स्मरणात राहतील. अशा या श्रेष्ठ आणि अभिनयाला वाहून घेतलेल्या अभिनेत्रीला त्रिवार सलाम...!

 - कविता भोसले
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat