लोकलची तहान, मेमूवर समाधान

22 May 2019 20:52:00



मुंबई-पुणे-नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणाची चर्चा वाहतूक आणि दळणवळण क्षेत्राच्या नेहमीच केंद्रस्थानी असते. मात्र, या त्रिकोणातील नाशिकचा कोन मात्र काहीसा दुर्लक्षितच राहिला आहे. नाशिक शहरापासून मुंबई आणि पुणे ही शहरे जवळ आहेत. येथे नियमितपणे प्रवास करणार्‍यांची संख्यादेखील जास्त आहे. तसेच, मुंबईची बाजारपेठ हे नाशिकच्या उद्योजक आणि कृषीमालासाठी हक्काचे ठिकाण आहे. नाशिकहून मुंबईकडे जाण्यासाठी अनेकविध रेल्वे उपलब्ध आहेत. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे नाशिककरांना त्याचा फारसा लाभ होत नाही. दुसरीकडे, नाशिक-पुणे रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी मागील दशकांपासून चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे. सध्या सुरू असणारी पंचवटी एक्सप्रेसदेखील नाशिक ते मुंबई असताना मनमाडला नेण्यात आली. त्यामुळे नाशिककरांची मागणी लक्षात घेऊन नाशिक ते कल्याण अशी लोकलसेवा सुरू करण्याबाबत चाचणी घेण्यात आली. यासाठीच्या तांत्रिक चाचण्यादेखील पूर्ण करण्यात आल्या. चेन्नई येथील कारखान्यात तयार करण्यात आलेले लोकलचे डबे मुंबईलादेखील आणले गेले आणि कसारा घाटातील बोगदे व फलाटांची उंची ही लोकल सेवेसाठी बाधक ठरली. मग मेमू गाडीचा पर्याय समोर आला. या गाडीची प्रवासी क्षमता लोकलपेक्षा कमी असून रुंदीदेखील कमी आहे. त्यामुळे या गाडीला कसारा घाटात अडचण येणार नाही. तसेच स्थानकांवरील फलाटांची उंचीदेखील वाढविण्याची गरज पडणार नसल्याची कारणे देण्यात आली आहे. तसेच, भुसावळ विभागातील पॅसेंजरला पर्याय म्हणून अशा मेमू सुरू करण्याची योजना असून ती सर्वार्थाने किफायतशीर असल्याचा दावादेखील केला जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर प्रश्न हा आहे की, लोकलसेवेबाबत एवढे कार्य होण्यापूर्वी त्यातील अडचणी आधीच समोर का आल्या नाहीत? आज नाशिक शहर झपाट्याने वाढत आहे. अशावेळी येथे दळणवळणाची साधने निर्माण करणे व त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. विकासाच्या गप्पांना ना प्रत्यक्ष कृतीशीलतेची जोड मिळत ना लोकल. किमान मेमू तरी नाशिकच्या पदरात निश्चितपणे पडावी, हीच अपेक्षा.

 

विचारशील निर्णय

 

व्यावसायिक शिक्षणक्रमात अभियांत्रिकी शिक्षण, वैद्यकीय शिक्षण तसेच व्यवस्थापन शिक्षण यांना आजच्या आधुनिक काळात महत्त्वाचे स्थान आहे. या शिक्षणक्रमातील अभियांत्रिकी शिक्षणास मात्र कोणत्याही इंटर्नशिप करणे बंधनकारक नाही. त्यामुळे अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे जरी ‘थिअरी’ अभ्यासक्रमात अव्वल असले तरी, त्यांना ‘फिल्ड’वरील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असतोच असे नाही. त्यामुळे पदवीपश्चात कार्य करताना या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कायमच प्रश्नचिन्ह उभे केले जात असते. त्यातच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असताना, त्यात आमूलाग्र बदल करण्याचा विचारशील निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार या विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आता विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार आहे. यासंदर्भात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने विद्यापीठांना काही दिवसांपूर्वी निर्देश दिले होते. नव्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आजच्या काळात अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळेलच, असे असणारे चित्र बदलले आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी कौशल्याअभावी नोकरीपासून वंचित असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी कंपनीमध्ये सहा महिने इंटर्नशिप करावी, असा विचार समोर आला होता. यापूर्वी तंत्रशिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात ‘इंटर्नशिप’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमातही अशाच प्रकारची ‘इंटर्नशिप’ सुरू करण्यावर भर दिला. तसे आदेश त्यांनी विद्यापीठांना दिले आहेत. नागपूर विद्यापीठाने याची अंमलबजावणी करीत अभ्यासमंडळांना त्याचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचे आदेश दिलेत. यानुसार नव्या शैक्षणिक सत्रापासून त्याची अंमलबजावणी होणार असून तिसर्‍या वर्षापासून ‘इंटर्नशिप’ लागू होण्याची शक्यता आहे. नागपूर येथील या विद्यापीठाचा हा कृतिशील निर्णय राज्यातील तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेदेखील अमलात आणण्याची गरज आहे. अभियंते हे देशाची बांधणी करण्यात मोलाचे योगदान देत असतात. त्यामुळे थिअरी ज्ञानाबरोबरच त्यांचे कौशल्य वृद्धिंगत होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना महाविद्यालयीन जीवनातच अशाप्रकारे फिल्डवरील कामाचा अनुभव प्राप्त करून देणे क्रमप्राप्त आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0