अनिल अंबानींकडून 'तो' खटला मागे...

    दिनांक  22-May-2019


 


काँग्रेसने सोडला सुटकेचा श्वास


अहमदाबाद : प्रसिद्ध उद्योगपती आणि 'रिलायन्स' समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी काँग्रेस नेते आणि नॅशनल हेरॉल्ड या वर्तमानपत्राविरुद्ध केलेला ५,००० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा मागे घेतला आहे. अहमदाबादच्या न्यायालयात नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल प्रकरणाबाबत प्रसिद्ध केलेल्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केला होता. या खटल्यावर अहमदाबादचे सिव्हिल आणि सेशन न्यायाधीश पी. जे. तमकुवाला यांच्या न्यायालयात कामकाज सुरु होते.

 

"आम्ही प्रतिवाद्यांना त्यांच्यावरील खटले मागे घेत असल्याबाबत सूचित केले आहे." अशी माहिती अंबानींचे वकील राकेश पारिख यांनी न्यायालयात दिली. "मानहानीचा खटला मागे घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या सुट्ट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेण्याबाबतची औपचारिक कार्यवाही पूर्ण केली जाईल." असे नॅशनल हेराल्ड आणि काँग्रेस नेत्यांचे वकील पी एस चंपानेरी यांनी सांगितले.

 

अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीप सिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी, संजय निरुपम यांच्या विरोधात सिव्हिल मानहानीचा खटला दाखल केला होता. या नेत्यांसोबतच काही पत्रकार आणि 'नॅशनल हेरॉल्ड' या वृत्तपत्राविरोधात देखील खटला दाखल केला होता. नॅशनल हेरॉल्डमध्ये 'अनिल अंबानी यांनी मोदींकडून राफेल कराराची घोषणा होण्याच्या १० दिवस आधी रिलायन्स रिलायंस डिफेंस कंपनी बनवली होती.', अशा आशयाचा लेख छापून आणला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat