नॅशनल पार्कमधील 'यश' कर्करोगाने ग्रस्त

    दिनांक  22-May-2019


 


कर्करोगासंबंधी उपचार करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार

 

मुंबई : गेल्या वर्षभरापासून ओठावरील गाठीमुळे त्रस्त असलेल्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या व्याघ्र सफारीतील 'यश' या नर वाघाला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर कर्करोगाशी संबंधित उपचार करण्याचा निर्णय तज्ज्ञ समितीव्दारे घेतला जाणार आहे. मात्र वाघांवर कर्करोगासंबंधी उपचार करणे वैद्यकीय दृष्टया कठीण बाब असल्याची माहिती तज्ज्ञ पशुवैद्यकांनी दिली आहे. यापूर्वी 'यश'च्या ओठावर आलेल्या गाठींवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

 
 

राष्ट्रीय उद्यानातच 'बसंती' वाघिणीच्या पोटी जन्मास आलेला 'यश' वाघ गेल्या ११ वर्षांपासून येथील व्याघ्र सफारीत वास्तव्यास आहे. मात्र अत्यंत रुबाबदार दिसणाऱ्या या वाघाच्या ओठावर वर्षभरापासून गाठी येत होत्या. गेल्यावर्षी जून महिन्यात 'यश'च्या ओठावर गाठ येण्यास सुरूवात झाली होती. तपासणी केल्यानंतर ती 'ग्रन्युलोमा' गाठ असल्याचे निदान झाले होते. गाठ न काढल्यास त्याजागी ट्युमर निर्माण होण्याची भिती होती. त्यामुळे उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पैठे यांनी तज्ज्ञ पशुवैद्यक डाॅ.सी.सी.वाकणकर यांच्या मदतीने आॅगस्ट महिन्यात या वाघावर शस्त्रक्रिया केली. त्यावेळी 'यश'च्या खालच्या ओठावरील मध्यभागामधून १२० ग्रॅम वजनाची गाठ काढण्यात आली. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र त्याचे वजन वाढत नव्हते. मार्च महिन्यात पुन्हा एकदा या वाघाच्या खालच्या ओठावर डाव्या बाजूला गाठ निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी देखील शस्त्रक्रिया करुन ४०० ग्रॅमची गाठ काढण्यात आली. या गाठीची तपासणी करण्याचे काम 'मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालया'तील पॅथॅालाॅजिस्टना देण्यात आले होेते.

 

 
 
 

त्यांनी दिलेल्या अहवालानुसार 'यश'ला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 'यश'ला 'रबाॅडोमोसोर्सकोमा' या दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. हा कर्करोग जन्मापासून अस्तिवात असला तरी विशिष्ट वयानंतरच त्याची लक्षणे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. हा कर्करोग अनुवांशिक असल्याचे, ते म्हणाले. सध्या या वाघाची प्रकृती स्थिर असून तो अन्न ग्रहण करत आहे. मात्र त्याला सफारीत प्रदर्शित न करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. त्याच्यावर कर्करोगासंबंधी उपचार करण्याचा निर्णय पशुवैद्यकांच्या तज्ज्ञ समितीव्दारे घेतला जाणार आहे. मात्र वाघांवर कर्करोसंबंधी उपचार करण्याची प्रक्रिया अवघड असते. या उपचारादरम्यान शरीरातील प्रतिकारशक्ती पूर्णपणे संपत असल्याने कोणत्याही प्रकारचा संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी लागते.

 
 

“वाघांवर कर्करोगाचे उपचार करणे अवघड बाब आहे. कर्करोग हा पूर्णपणे बरा होण्याची खात्री देता येत नाही. शिवाय तो शरीरात पसरू ही शकतो. - डाॅ. सी.सी.वाकणकर, तज्ज्ञ पशुवैद्यक”

 

 
 वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat