विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्य़ू

    दिनांक  21-May-2019


 

जुन्नरमधील धोलवड गावातील घटना

मुंबई : बिबट्यांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरमध्ये मंगळवारी एका नर बिबट्याचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. धोलवड गावातील एका उसाच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडला होता. अशक्तपणा आणि जखमी असल्याने अखेरीस या बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

 

उसाच्या शेतात वास्तव्य करून माणसांसोबत सहजीवन करणाऱ्या बिबट्यांसाठी जुन्नर तालुका प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महिन्यातून तीन ते चार वेळा बिबट्या बचावाच्या घटना घडत असतात. यामध्ये बिबट्या विहिरीत पडण्याच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशाच प्रकारची बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मात्र दुर्दैवाने या बिबट्य़ाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बिबट्याचे पाण्यावर तरंगणारे मृत शरीर वन विभागाने विहिरीबाहेर काढले.

 

 
 

धोलवड गावातील शंकर नलावडे यांच्या उसाच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडला होता. मंगळवारी सकाळी विहिरीवरील पाण्याचा पंप चालू करण्यासाठी गेलो असता बिबट्या विहिरीतील पाण्याचा पाईप धरुन बसल्याचे दिसले, अशी माहिती शंकर नलावडे यांनी दिली. त्याच्या डोक्याला मार लागल्याचे दिसल्याने आम्ही ताबडतोब सरपंचाच्या मदतीने वन विभागाशी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अशक्तपणामुळे बिबट्याने पाण्याचा पाईप सोडला आणि तो पाण्यात बुडाला. त्यादरम्यान वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र बिबट्याचे शरीर पाण्याखाली गेले होते. दोन तासांनी बुडालेले बिबट्याचे शरीर पाण्याच्या पृष्ठभागावर आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढल्याचे, नलावडे म्हणाले. 

 
 

दुसऱ्या बिबट्यासोबत हद्दीसाठी झालेल्या झटापटीत या बिबट्याला जखमा झाल्याची माहिती माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अजय देशमुख यांनी दिली. हा बिबट्या नर असून अंदाजे पाच ते सहा वर्षांचा आहे. झटापटीत तो विहिरीत पडल्याची शक्यता असून रात्रभर तो विहिरीत पोहत असल्याने अशक्त झाला. अखेरीस पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat