विवेक ओबेरॉयचा माफीनामा

21 May 2019 12:56:29

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जीवनपटात मुख्य भूमिका साकारल्यामुळे चर्चेत आलेला विवेक ओबेरॉय आता नव्याच वादंगाचा विषय बनला आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारे एक मिम त्याने काल शेअर केले आणि त्यावर बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी हल्लाबोल केला. असे ट्विट करणे हे योग्य की अयोग्य याविषयी चर्चा सुरु झाल्या. सर्जनशीलता असावी पण ती इतक्या खालच्या पातळीची असू नये असे मत बऱ्याच जणांनी व्यक्त केले.

 

विवेक ओबेरॉय हा एक चांगला अभिनेता आहे परंतु त्याने असे का केले असावे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. विवेक ओबेरॉयने आपले ट्विट डिलिट केले असले आणि माफी मागितली असली तरी देखील त्याच्या या कृत्याचे हे प्रायश्चित्त असू शकत नाही हे देखील तितकेच खरे. या आधी काही पत्रकारांशी यासंबंधी बोलताना आपल्याला कोणतीही खंत नसल्याचे आणि हे मिम फक्त एका सर्जनशीलतेची कौतुक या हेतूने मी शेअर केल्याचे स्पष्टीकरण विवेक ओबेरॉयने दिले होते.


 

सोनम कपूर, ज्वाला गुत्ता, उर्मिला मातोंडकर अशा अनेक प्रथितयश कलाकारांनी विवेक ओबेरॉयला विरोध दर्शवला. या मिमने काल सोशल मीडियावर हाहाकार माजवल्यावर याला उत्तर देणारे आणखी एक मिम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

यामध्ये प्रश्न शेवटी एवढाच राहतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे ही गोष्ट खरी आहे पण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अशा प्रकारची पातळीहीन मजा करणे हे कितपत योग्य आहे? ते प्रत्येकाला समजले पाहिजे नाहीतर अशा प्रकारची सोशल मीडिया युद्ध सुरूच राहतील.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0