व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी जागतिक स्तरावरील पद्धतींचा अवलंब करावा – उपराष्ट्रपती

    दिनांक  21-May-2019जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक स्थळ ठरला असल्याचे उपराष्ट्राती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नईतल्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करत होते. व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी जागतिक स्तरावरील पद्धतींचा अवलंब करुन उच्च दर्जाचे प्रशिक्षण द्यावे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.


विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्यावर केंद्रीत करावे आणि सामाजिक भान असलेले नागरिक व्हावे, असे मार्गदर्शन उपराष्ट्रपतींनी केले. विद्यापीठांच्या परिसरातले वातावरण कुठल्याही बाह्य मुद्यांनी कलुषित झालेले नसावे, असे सांगून देशातल्या ९०० पैकी तुरळक अपवाद वगळता, बहुतांश विद्यापीठांमध्ये अशा बाबींपासून मुक्त असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. व्यवस्थापन केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरता मर्यादित नसून, व्यवस्थापन अभ्यासात ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी आणि संलग्न उद्योगही समाविष्ट झाले पाहिजेत, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

पुढील काही वर्षात भारत ५ ट्रिलिअन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असताना आर्थिक असंतुलन, शहरी-ग्रामीण दरी, सामाजिक भेदभाव आपण दूर करण्याची गरज आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय, कॅग, केंद्रीय दक्षता आयोग, संसद आणि राज्य विधिमंडळांसारख्या सर्व संस्थांचा गौरव वृद्धिंगत करण्याची, त्यांचे पावित्र्य जपण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat