इव्हीएमवर संशय : विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

    दिनांक  21-May-2019नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विरोधकांनी इव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. व्हीव्हीपॅट मतदानाची शंभर टक्के मतमोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. इतकेच नाही, तर प्रत्येक वेळेला त्याच त्याच विषयांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे.

 

याचदरम्यान मंगळवारी इव्हीएमच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात बैठक होणार आहे. त्यानंतर इव्हीएमबाबतीत निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. इव्हीएमवर घेतलेल्या संशयावरून निवडणूक आयोगाने यूपीतील चार याचिका फेटाळून लावल्या आहेत. इव्हीएम सुरक्षित असून त्यावर विश्वास ठेवावा असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

 

एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका करत मतदानाच्या पडताळणीसाठी इव्हीएमसोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांचीही मतमोजणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्चन्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार सर्व इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट पक्षाच्या उमेदवारांसमक्ष सुरक्षित सीलबंद केल्या आहेत. त्याचे व्हिडिओही काढण्यात आले आहेत. त्यामुळे इव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.

 

उत्तरप्रदेशात निवडणूक आयोगाने इव्हीएमच्या सुरक्षेला घेऊन केलेल्या याचिका फेटाळल्या. राजकीय पक्षांनी इव्हीएमवर विश्वास ठेवावा. इव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे. एक्झिट पोलनंतर विरोधकांकडून इव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय पराभवाच्या भीतीपोटी घेतला जातो आहे, अशी टीका भाजपने विरोधकांवर केली आहे.

 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. ‘इंडिया टुडे’ आणि ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इव्हीएमवर संशय नको म्हणून तीन राज्यांत काँग्रेसचा विजय मात्र, काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यातील काँग्रेसच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागले, तर ज्या राज्यात काँग्रेस जिंकेल ते फक्त भाजपचे षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी केला. या तीन राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने देऊन इव्हीएमवर घेण्यात येत असलेला संशय दूर करण्याचा भाजपचा डाव होता, हे सिद्ध होईल असे त्यांनी सांगितले होते; तर ममता बॅनर्जी यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat