किल्ले रायगडला 'वर्ल्ड हेरिटेज स्टेशन' बनवणार

    दिनांक  21-May-2019


 


खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला संकल्प


किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तबगारीची जगभर ओळख निर्माण होण्यासाठी रायगडला 'वर्ल्ड हेरिटेज स्टेशन' बनवण्याचा संकल्प केला असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. किल्ले रायगडवर आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. रायगडावरील भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात ही बैठक पार पडली.

 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे पाच व सहा जून रोजी रायगडवर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केले आहे. यासाठीच्या पूर्वनियोजांसाठी आढावा बैठक घेण्यात आली. किल्ले रायगडवर साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा तुमचा आमचा उत्सव राहिला नसून तो आता लोकोत्सव बनला आहे. त्यामुळे हा सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी हा सोहळा अतिशय देखण्या स्वरुपात व शिस्तीत पार पाडावा, असे आवाहन यावेळी संभाजीराजेंनी केले.

 

यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगताना संभाजीराजेंनी शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat