समाजसागरातील समरस दीपस्तंभ

    दिनांक  21-May-2019   नाही रेगटातल्या व्यक्तीने आयुष्यातील काटे बाजूला सारत फुलांच्या सुगंधाचे देणेकरी व्हावे. परंतु, हे सगळ्यांनाच शक्य नसते. या पार्श्वभूमीवर सुनील यांचे जगणे पथदर्शक आहे.

सामाजिकस्तरावर अत्यंत उतरंडीला असणारा मी आज ‘समरसता यात्रे’च्या माध्यमातून काळाराम मंदिराच्या गर्भागृहात पूजा करीत होतो. माझ्या बाजूला उभे होते सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, रमेश पतंगे, दादा इदाते, रमेश महाजन यांसारखे समरसतेचे मानकरी. त्यावेळी पुजारी म्हणत होते, ’माझ्या आजोबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मंदिरप्रवेश नाकारला होता. पण, आज सर्व समाजाला सोबत घेऊन पूजा करताना त्या पापाचे क्षालन झाले असे वाटते.’ हा क्षण माझ्या आयुष्यातला अभिमानाचा, प्रेरणेचा आहे,” हे सांगताना ‘अखिल भारतीय होलार समाजसंघा’चे सरचिटणीस आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख सुनील भंडगे भावविभोर होतात.

 

मूळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या कुंभारी गावचे भंडगे कुटुंब. देशाच्या स्वातंत्र्याआधी भंडगे कुटुंब पुण्याला आले. दादोजी भंडगे आणि सावित्री भंडगे कष्टाळू आणि धार्मिक दाम्पत्य. दादोजी त्यावेळी पुणे कौन्सिलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागले, तर सावित्रीबाई या झाडू काम खात्यात कामाला लागल्या. उभयंतांना सहा मुले. तीन मुली, तीन मुलगे. त्यापैकी शेंडेफळ सुनील. सुनील चौथीमध्ये शिकत असतानाच दादोजी क्षयरोगाने आजारीपडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी दोन मुलींची लग्न झालेली. दुसर्‍या मुलीच्या नशिबी दारूड्या नवर्‍यासह सासुरवासआला. तिचा काडीमोड होण्याची परिस्थिती निर्माण झाली. सावित्रीबाईंनी फाटलेल्या आकाशाला ठिगळं तरी कुठे कुठे लावायची?

 

नुसते पाणी पिऊन पोटाला आसरा द्यायचा आणि गपगुमान झोपून जायचे, असे अनेक दिवस यायचे. या सगळ्या परिस्थितीत सावित्रीबाईंनी कधीही धीर सोडला नाही. उलट त्या सुनीललाकुशीत घेऊन म्हणत, “मी उन्हातान्हात धुळी-घाणीत झाडू मारते, पण माझी लेकरं पंख्याखाली बसून फायली तपासणारी व्हायला पाहिजेत.” तिच्या जिद्दीमुळे बहिणीसोडून या तीन भावंडांनी उच्चशिक्षण घेतले. बहीण-भावांची लग्न झाली. त्यांचे संसार सुरू झाले. मागे उरले केवळ सावित्रीबाई आणि सुनील. सावित्रीबाईंचे कष्ट काही संपत नव्हतेच. सुनील यांनी मनात विचार केला की, कितीही शिकलो पुढे गेलो तरी, आपल्या माणसांशी, मातीशी इमान राखायचे. याच काळात अभाविपने महाविद्यालयात एक आंदोलन केले. त्या आंदोलनात सुनील सहज सामील झाले. त्यांचे इथूनच अभाविपशी ऋणानुबंध जुळले. ते पहिल्यांदा अभाविपच्या कार्यालयात गेले. कार्यालयात स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला. हे दोन्ही फोटो सुनील पहिल्यांदाच एकत्र पाहत होते. अभाविप पर्यायाने रा. स्व. संघ जातीअंताचा आणि समाजउत्थानाचा विचार करते याची जाणीव पहिल्यांदा त्यांना इथे झाली. पुढे अभाविपमध्ये काम करताना अ‍ॅड. बाळासाहेब आपटे, अनिरुद्ध देशपांडे खूपदा वस्तीतल्या घरी यायचे.

 

अनिरुद्ध देशपांडे पहिल्यांदा घरी जेवायला आले. त्यावेळी घरी साधी आमटी-भाकरी असे नेहमीचेच जेवण होते. त्यावेळी सुनील आणि सावित्रीबाईंना वाईट वाटले की, पाहुण्यांना साधे अन्न खावे लागत आहे.पण अनिरुद्ध आणि त्यांच्यासोबतचे अभाविपचे कार्यकर्ते समोर पंचपक्वान्न आहेत, अशा थाटात जेवले. त्या दिवशी सावित्रीबाई खूप आनंदात दिसल्या. त्या म्हणाल्या, “तू चांगल्या विचारांच्या माणसात काम करतोस.” पुढे सुनील बँकेत कामाला लागले. त्याचवेळी त्यांनी संगीता पोटफोडे या ‘स्वरूपवर्धिनी’च्या कार्यकर्तीशी आंतरजातीय विवाह केला. आयुष्यात एक स्थिरता आली. डॉ. मुकुंद तापकिर आणि डॉ. राजेंद्र हिरेमठ यांच्या सहकार्याने तसेच ‘डिक्की’च्या डॉ. मिलिंद कांबळेंच्या मदतीने त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळवली. विषय होता, पश्चिम महाराष्ट्रातले दलित उद्योजक आणि त्यांचे आर्थिक विकासातील योगदान. पण सुनील यांच्या ‘डॉक्टरेट’ मिळवण्यामागची प्रेरणाही सावित्रीबाईच आहेत. त्याचे झाले असे की, ६ डिसेंबर, १९९० रोजी बाबासाहेब आंबेडकरांवरील कार्यक्रमामधील रुपकाचे लेखन सुनील यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना निवेदिका चुकून म्हणाली, “लेखक डॉ. सुनीलभंडगे.” कार्यक्रम संपला. सावित्रीबाईंनी विचारले, “तू डॉक्टर आहेस का? त्या मॅडमने बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमात तुला चुकून ‘डॉक्टर’ म्हटले. आता त्या नावाला जागले पाहिजे.” त्या अगदी तळमळीने सांगत होत्या. त्यामुळे वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेऊन एम.फिल झालेल्या सुनील यांनी ‘डॉक्टरेट’ करण्याचा निर्धार केला. सुनील सांगतात, “पी.एचडी करताना रमेश पतंगे आणि दादा इदाते यांच्या भाषणांचा मला खूप उपयोग झाला. त्यांचे विचार या पी.एचडीचे आधार आहेत.”

 

होलार समाजाचा असूनही तू संघपरिवाराशी का जोडला गेलास, असे म्हणत वाद घालणारे काही लोकही भेटले. पण, ‘निर्मल, शुद्ध, सात्त्विक प्रेम ही कार्य का आधार है,’ अशी संघप्रेरणा लाभलेले सुनील कायम शांतपणे समन्वयच साधत गेले. यामुळेच की काय, महाराष्ट्रभर जिथे जातीपातीवरून मारझोड-तोडातोड म्हणत गट पडतात, तिथे सुनील हमखास समरसतेची समन्वय भूमिका घेऊन यशस्वी मध्यस्थी करतात. त्यांच्यातल्या समसरसतावादी समन्वयकाची भूमिका म्हणजे समाजसागरातील समरस दीपस्तंभच आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat