वाढत्या आत्महत्या आणि समाज

    दिनांक  21-May-2019एकीकडे कितीही अडचणींना सामोरे जावे लागले तरी खुल्या मनाने जगणारी माणसं, तर दुसरीकडे अगदी क्षुल्लक कारणांसाठी लोकांच्या जीवावर उठणारी माणसंही कमी नाहीत. ज्यांच्या पायावर अफाट पैसा, अमाप प्रसिद्धी लोळण घालते, अशांनीही आत्महत्येचा अंतीम मार्ग पत्करलेला दिसतो. त्यात बॉलिवूड आले, धनाढ्य आले आणि राजकारणीही... यात गुरुदत्तपासून ते सिल्क स्मिता असो किंवा कोवळ्या वयाची जिया खान, यांसारख्या सेलिब्रिटीच्या आत्महत्यांच्या घटना पाहता, सामान्य माणसाला प्रश्न पडतो की, ही एवढी श्रीमंत, ऐषोरामात जगणारी लोकं आत्महत्या का करतात? आमच्याकडे तर काही नसूनही जीवनाचा गाडा कसाबसा हाकतो. मग यांच्याकडे सर्व सुख-सोईसुविधा दिमतीला असूनसुद्धा त्यांनी आपले आयुष्य का संपविले? पण, केवळ पैसा पुरेसा नसतो, तर आयुष्यात शांती, समाधानही तितकेच महत्त्वाचे, जे न मिळाल्यामुळे या धनाढ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो. ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ने भारतातील आत्महत्यांचा शास्त्रीय अभ्यास केला. या अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख आत्महत्या होतात. यात आत्महत्या करणारे ४० टक्के पुरुष व ५९ टक्के महिला या १५ ते २९ वयोगटातील आहेत. दरवर्षी देशातील हजारो मुले-मुली स्वत:चे आयुष्य संपवून टाकतात. भारतातील आत्महत्यांची नोंद ठेवणार्‍या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार, २००९ पासून दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या अडीच टक्क्यांनी वाढली आहे. शेतीच्या प्रश्नामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात, तर अभ्यासाच्या तणावाने अनेक मुले आत्महत्या करतात. तरुणांना आयुष्यामध्ये अपयश पचवणे कठीण झाले असून ‘अपयशी होणे म्हणजे सर्व संपणे’ अशीच त्यांची समजूत आहे. करिअर व प्रेमाच्या नातेसंबंधात आलेले अपयश पचवणे तरुण पिढीला अवघड जाते. आयुष्यात काहीही नसताना जगण्यासाठी धडपडणारी माणसे आहेत. कोणत्याही कारणाने इतका मौल्यवान जीव देणे नक्कीच योग्य नाही. आलेल्या संकटाला तोंड देऊन जगण्यातली मज्जा घेणे हे औरच...गळ्याला फास लावून किंवा विष पिऊन आयुष्याला पूर्णविराम देण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे जीवन आनंदाने जगायला शिका. नैराश्य आले तरी त्याच्यावर कशी मात करायची, याची पूर्वतयारी करा आणि त्यातून बाहेर पडा. जीवन अनमोल आहे. ते मनसोक्त जगा!

 

सुखी जीवनाची किल्ली

 

मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुऐं मै उडता चला गया,‘ मोहम्मद रफींचे हे गाणं आपल्या सर्वांच्या आयुष्याशी खूप निगडित आहे. जीवनाची साथ देत आणि येणार्‍या संकटांना धुळीत मिळवत पुढे चालत राहणे, हेच जीवन. या जगात संपूर्ण सुखी असा कोणीच नाही. त्यामुळे हसा आणि हसवा. हसणे आणि हसवणे कला आत्मसात करण्यासाठी मुळात मनात खिलाडू वृत्ती असणे गरजेचे आहे. माणूस आयुष्यात ठेच लागल्याशिवाय किंवा पडल्याशिवाय चालू शकत नाही. पण ठेच लागली म्हणून चालणेही सोडू शकत नाही. आपल्या जीवनाचे गणितही असेच. वाढत्या ताणाला कंटाळून आत्महत्या करण्यापेक्षा जगण्याची कला शिका. आपल्या मनाला खंबीर बनवून जीवनातील संघर्ष आणि अडचणींना हसतखेळत तोंड द्या. आपले आयुष्य अमूल्य आहे. त्याला संपवू नका. जीवनातील संघर्ष आणि तणावावर मात करा. क्षमता वाढविल्यास बिनधास्तपणे जगण्याचा प्रयत्न करा. विहिरीत उडी मारणे, जाळून घेणे, फाशी लावून घेणे किंवा रेल्वे गाडीखाली जीव देणे या प्रकारांद्वारे आयुष्य संपविणार्‍यांनी अनमोल आयुष्याची किंमत शून्य केली आहे. आत्महत्या करणार्‍यांची वाढती संख्या समाजाच्या दृष्टीने घातक आहे. सध्याच्या गतिमान जीवनशैलीमुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशी सर्वत्रच एक तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. तसेच माहिती-तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊनही अनेकांनी आपले आयुष्य आपल्या कर्मानेच संपविले आहे. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाच्या प्रकाशात आंधळ्या झालेल्या व्यक्तींना योग्य समुपदेशन करण्याची नितांत गरज आहे. मैत्रीचा, मायेचा, ममतेचा पाठिंबा मिळाला, तर सर्व काही नीट होऊ शकते. ताणतणावात अडकलेल्यांनी आपल्यातील ‘फायटिंग स्पिरीट’ कायम ठेवावे, हाच यावरचा उपाय. सकारात्मक विचार, इतरांशी तुलना न करणे, आपण आणि आपले काम इतका विचार करायला आपण सुरुवात जरी केली, तरी आयुष्यातील बदल आपल्याला दिसून येतील. त्यामुळे जीवनात आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत अडचणी, संकटे येतच राहणार, त्यांना तोंड द्या. मग कोणत्याही कठीण प्रसंगात जीवनाचा हा मंत्र कायम लक्षात ठेवा. ‘जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरुनी जावे, पुढे पुढे चालावे..’

- कविता भोसले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat