साध्वीची पुन्हा एकदा माफी; २१ तासांचे मौन पाळणार

20 May 2019 14:54:15



भोपाळ : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे वादग्रस्त विधान करून अडचणीत आलेल्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. साध्वी यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात मोठा वादंग निर्माण झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वीच्या या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत साध्वीला कदापि माफ करणार नसल्याचे म्हटले होते.


आपल्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण होत आहे असे लक्षात आल्यानंतर साध्वीनी लगेचच माफीही मागितली होती. यानंतर निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. ट्विट करत त्यांनी म्हटले, "मतदान संपल्यानंतर आता चिंतन करण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या काळात माझ्या वक्तव्यांमुळे देशबांधवांना दुःख झाले असेल तर मी त्यांची माफी मागते." यावेळी त्यांनी प्रायश्चित म्हणून २१ तास मौन पाळणार असल्याचेही सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0