राणीबागेत आले सुरतेहून नवे पाहुणे

    दिनांक  20-May-2019


 

मादी अस्वल आणि कोल्ह्याची जोडी दाखल : नव्या पिंजऱ्यांचा मात्र पत्ता नाही 

मुंबई (अक्षय मांडवकर) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भासले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) आता गुजरातमधील सुरतेहून काही नवीन पाहुणे दाखल झाले आहेत. दक्षिण भारतातून आणलेल्या कोल्ह्यांच्या जोडीला आणखी काही साथीदार मिळावेत म्हणून सुरतेहून कोल्ह्यांची अजून एक जोडी राणीबागेत दाखल करण्यात आली आहे. याशिवाय एका मादी अस्वलाचे आगमनही झाले आहे. मात्र अजूनही नव्या पिंजऱ्यांचे बांधकाम पूर्ण झालेले नसताना नवीन प्राण्यांना दाखल करून घेण्याची घाई राणीबाग प्रशासन करत असल्याचे चित्र यातून दिसत आहे. 

 

गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरातील एकमेव प्राणिसंग्रहालयाचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे काम आता अंतिम टप्यात पोहोचले असल्याने त्यांनी नवीन प्राण्यांच्या आगमनाला सुरूवात केली आहे. याअंतर्गत मे महिन्याच्या सुरुवातीला मंगलोर येथील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्याची जोडी आणण्यात आली होती. त्याबदल्यात राणीबाग प्रशासनाने त्यांना मकाऊ आणि काही पाणपक्षी दिले आहेत. आता या कोल्ह्यांच्या जोडीला साथीदार मिळावेत म्हणून सुरत येथून आणखी एक कोल्ह्याची जोडी राणीबागेत दाखल करुन घेण्यात आली आहे.

 
 

कोल्ह्य़ांच्या नव्या जोडीबरोबरच मादी अस्वलाचे आगमनही राणीच्या बागेत झाले आहे. त्यामुळे नव्या पिंजऱ्यात या प्राण्यांना हलविल्यानंतर मुंबईकरांना अस्वलाचे दर्शनही घेता येणार आहे. सुरत महानगरपालिकेच्या 'सरथाना नेचर पार्क अॅण्ड झू' येथून या प्राण्यांना आणण्यात आल्याची माहिती राणीबाग प्रशासनातील एका कर्मचाऱ्याने दिली. गेल्या आठवड्यात राणीबागेतील पशुवेैद्यकांचे पथक या प्राण्यांना आणण्यासाठी सुरतला गेले होते. लवकरच गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंहांची एक जोडी राणीबागेत दाखल होणार आहे.

 

प्राण्यांना आणण्याची घाई ?

नव्या पिंजऱ्यांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत दाखल होणाऱ्या नव्या प्राण्यांना आतल्या भागातील छोट्या पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र काही नव्या पिंजऱ्यांचे काम अजून पूर्णत्वापर्यंत पोहोचलेले नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून नव्या प्राण्यांना दाखल करण्याची घाई होत असल्याचे चित्र दिसत आहे. दाखल केलेल्या मादी अस्वलाचा स्वतंत्र्य प्रदर्शन पिंजरा पूर्ण होण्यासाठी अजून चार-पाच महिन्यांचा अवधी लागणार असल्याची माहिती राणीबाग प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. तोपर्यत या मादीला आतल्या छोट्या पिंजऱ्यामध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे काही नव्या पिंजऱ्यांची उभारणी अजूनही प्राथमिक स्तरावर असताना राणीबाग प्रशासन नव्या प्राण्यांना दाखल करण्याची घाई करत असल्याचे दिसत आहे.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat