
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील निवडणुकांनंतर माध्यमांनी आपले एक्सिट पोल जाहीर केले. या सर्व एक्सिट पोलमध्ये भाजप व मित्रपक्ष बाजी मारणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे भाजप व मित्रपक्षांमधे उत्साह संचारला असला तरी हे पोल पाहून विरोधकांचे पित्त खवळले आहे. अनेकांनी माध्यमांवरच आरोप केले असून पत्रकारांना मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. तर काहींनी हे एक्सिट पोल मॅनेज केले असल्याचा आरोप केला आहे.
मी अशा एक्सिट पोलवर विश्वास ठेवत नसल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एक्सिट पोलची चर्चा ही केवळ ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या एक्सिट पोलनंतर खचून न जाता, विरोधकांना एकत्र राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही हे सर्व एक्सिट पोल खोटे असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियामधील एक्सिट पोलचे उदाहरण देत, येथील ५६ वेगवेगळे एक्सिट पोल खोटे ठरल्याचे सांगितले. भारतीय मतदार पोल घेणाऱ्यांना कधीही खरं सांगत नाही. त्यामुळे खऱ्या निकालासाठी २३ मेची वाट पाहणार असल्याचे थरूर म्हणाले.
नॅशनल कॉन्फरेन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुला यांनी टीव्ही बंद करण्याची आणि सोशल मीडियामधून लॉग आऊट करण्याची वेळ आली असल्याचे सांगत २३ मे पर्यंत निकालाची वाट पाहणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माध्यमांवर हल्लाबोल केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat