मुंबई-अहमदाबादनंतर या मार्गावर धावणार दुसरी बुलेट ट्रेन

    दिनांक  20-May-2019


नवी दिल्ली : मोदी सरकारच्या घोषणेनुसार देशात २०२२ रोजी पहीली बुलेट ट्रेन धावणार आहे. देशवासीयांना या क्षणाची प्रतिक्षा आहेच मात्र आता पुन्हा नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या बुलेट ट्रेनच्या मार्गाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या मार्गाची अंतिम मुदत ही २०२३ सांगण्यात येत आहे. याच दरम्यान सरकारने नव्या बुलेट ट्रेनच्या मार्गाची योजना आखली आहे. जेव्हा पहीली बुलेट ट्रेन धावेल त्यावेळी त्वरीत दुसऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या भूमीपूजनाने सुरुवात केली जाणार आहे. या प्रस्तावित मार्गासाठी भूसंपादन आणि डीपीआरसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. नवी सरकार स्थापन झाल्यावर कॅबिनेटच्या बैठकीत संबंधित प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो, अशी शक्यता उच्चपदस्थ सुत्रांनी व्यक्त केली आहे.

 

बुलेट ट्रेनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी म्हैसुर-बंगळूरू-चेन्नई या मार्गासाठी सर्वेक्षण घेण्यात आले होते. भारतातील जर्मन उच्चायुक्त मार्टीन यांनी ही माहीती दिली होती. हा अहवाल त्यांनी रेल्वेचे तत्कालीन अध्यक्ष अश्वीनी लोहानी यांच्याकडे सुपूर्द केला होता. या मार्गावर बुलेट ट्रेन धावेल कि नाही यावर नवे सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. अन्यथा चेन्नई-कन्याकुमारी हा मार्ग सुचवला जाऊ शकतो. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी जपान अर्थसहाय्य करत आहे. तर दुसऱ्या मार्गासाठी जर्मनीतर्फे मदत केली जाणार आहे. 'नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्परेशन' मुंबई-अहमदाबाद बुटेल ट्रेन प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहत आहे. या कॉरीड़ोअरची लांबी ५०८.१७ किमी आहे. हा मार्ग महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह केंद्र शासित प्रदेशांतूनही जाणार आहे

 

भविष्यात एकूण १० बुलेट ट्रेन प्रकल्प

या अहवालानुसार, केंद्र सरकारतर्फे १० बुलेट ट्रेन प्रकल्प योजनांद्वारे शहरे जोडणार आहे. याद्वारे देशभरातील एकूण सहा हजार किमी मार्ग बुलेट ट्रेनच्या अंतर्गत आणला जाणार आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावित मार्गांसाठी सविस्तर सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची परवानगी कॅबिनेटकडे पाठवण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat