पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर उपलब्ध करणार : पालकसचिव

    दिनांक  20-May-2019पालघर : शासनाने पालघर जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातील ३५ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. या गावांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून शासनाने जाहीर केलेल्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा पालघर जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टंचाई परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत गाव पातळीपर्यंत सर्व यंत्रणांशीऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधून पालक सचिवांना आपल्या जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून वर्मा यांनी जव्हार येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विविध सोयी-सुविधा, सवलतींद्वारे रहिवाशांना दिलासा देण्याचे निर्देशसर्व संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन आणि क्षेत्रीय यंत्रणा योग्य नियोजन करून चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पालघर जिल्ह्यात पाणीटंचाई, दुष्काळ निवारण व रोहयोंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सवलती लागू करण्यात आल्या असून मागणी आल्याप्रमाणे पाण्याचे टँकर्स तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी केलेल्या सादरीकरणाद्वारे दिली. पशुधनासाठी लागणाऱ्या पाण्याचाही विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मोखाडा तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनेसाठी नियोजन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील, जिल्हापरिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

पाणीपुरवठा

 

जिल्ह्यातील ४६ गावे आणि १२९ वाड्यांना दि. १६ मे रोजीपर्यंत ४१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये वाडा तालुक्यात चार गावे आणि २८ वाड्यांना चार टँकर्सद्वारे सरासरी १३ फेऱ्या, विक्रमगड तालुक्यात एक गाव आणि आठ वाड्यांना एका टँकरद्वारे सरासरी १९ फेऱ्या, जव्हार तालुक्यात १० गावे आणि २० वाड्यांना सहा टँकर्सद्वारे सरासरी २३.५ फेऱ्या, मोखाडा तालुक्यात २८ गावे आणि ६७ वाड्यांना २६ टँकर्सद्वारे सरासरी ९० फेऱ्या, तर मोखाडानगर पंचायत क्षेत्रात तीन गावे आणि सहा वाड्यांना चार टँकर्सद्वारे सरासरी १३ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 

दुष्काळ अनुदान वाटप

 

पालघर तालुक्यात २०५ गावांमधील याद्या तयार झालेल्या ३० हजार, १२८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप २०१८ हंगामातील दुष्काळ अनुदान वाटपाची मदत जमा करण्यात आली असून मंजूर अनुदानाच्या तुलनेत हे प्रमाण ९८.७२ टक्के इतके आहे. विक्रमगड तालुक्यात ८६ गावांतील १४ हजार, ७५२ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली असून त्याचे प्रमाण ८०.९० टक्के आहे. तलासरी तालुक्यात ४२ गावांमध्ये ६ हजार, २९४ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झाली. त्याचे प्रमाण मंजूर अनुदानाच्या तुलनेत ७५.३० टक्के आहे. ही टक्केवारी प्राप्त अनुदानाच्या ८८.५३ टक्के इतकी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat