काँग्रेस खेळणार 'दलित-मराठा' रणनीती

    दिनांक  20-May-2019विरोधी पक्षनेते पदासाठी वर्षा गायकवाड यांचे नाव चर्चेत


मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची वर्णी लागणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासाठीच आज कॉंग्रेस आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला होणार आहे.

 

मागील महिन्यापासून हे पद रिक्त असून काँग्रेसला अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी नेता सापडत नसल्याचे दिसत आहे. असे असले तरी आज होणाऱ्या बैठकी अगोदर काँग्रेसमधून काही नावे समोर आली आहेत. यामध्ये आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे. यासोबतच विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार व अमित देशमुख यांचे नावेही चर्चेत आहेत.

 

गायकवाड यांना दलित समाजाचे नेतृत्व म्हणुन पुढे आणण्याची कॉंग्रेसची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. याला सामोरे जाण्यासाठी वर्षा गायकवाड हा चांगला पर्याय असू शकतो असे काँग्रेसच्या निवड समितीला वाटते.

 

तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे मराठा समाजाचे असल्याने दुसरा मराठा नेता विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक होण्याची शक्यता कमीच आहे. जर गायकवाड यांना विरोधी पक्षनेतेपद दिले तर गायकवाड व चव्हाण यांच्यामुळे 'दलित-मराठा' समीकरण साधले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार अशा चर्चाना उधाण आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat